बीड, बारामती मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले, असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. बीडमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेण्यात आली, बारामतीत एक बँक मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत उघडी होती. बोगस मतदान करणे, लोकांना मतदान न करू देणे, असे प्रकार घडल्याचेही पवार म्हणाले.
राज्यात चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचा, बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे प्रकार बीड, बारामती तसेच पुणे मतदारसंघात घडले. यावरून काहूर उठलेले असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बीड, बारामतीत बोगस मतदान झाल्याचा स्पष्ट आरोप केला. बीड, पुणे आणि बारामती वगळता चौथ्या टप्प्यात शांततेत मतदान झाले. मात्र या तीन मतदारसंघांत अनेक गैरप्रकार घडले. निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात एवढा पैशांचा वापर कधीही पाहण्यात आला नाही. बारामती मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी एक बँक रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवण्यात आली होती. बीडमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेऊन बोगस मतदान करण्यात आले. लोकांना मतदान करू न देण्याचे प्रकारही या निवडणुकीत पाहायला मिळाल्याचे शरद पवार म्हणाले. पुण्यात देखील अशा घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
जे संघाचे तेच शिंदे, अजितदादांचे
भाजप आता सक्षम झाला असून, आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचे भाजपचेच राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा म्हणाले आहेत. ज्यांचा राजकीय विचारच संघाच्या मुशीतून येतो, त्या संघाबद्दल भाजपचे असे मत असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दलही त्यांचे मत फार वेगळे असेल असे वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शिंदे, अजितदादांची ज्या दिवशी गरज संपेल त्यादिवशी त्यांच्याबद्दलही असेच बोलले जाईल, असे पवार म्हणाले.
बजरंग सोनवणे थेट स्ट्राँगरूममध्ये
बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आज ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमला भेट दिली. परळीसह इतर काही ठिकाणी प्रचंड बोगस मतदान करण्यात आले असून, 19 केंद्रांवर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी सोनवणे यांनी मतदानाच्या दिवशीच केली आहे. परळीसह इतर ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान करण्यात आल्याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.