कानपूर कसोटीला शाकिब मुकणार

अनफिट असूनही चेन्नई कसोटीत उतरलेल्या शाकिब अल हसनला आपला खेळ दाखवताच आला नाही. उलट तो वारंवार अनफिट असल्याचाच भास होत होता. गेल्या वर्षी त्याच्या अंगठयाला तर आता खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झाल्याचे बोलले जात होते. मात्र कसोटीदरम्यान त्याची देहबोली सारेच सांगून गेल्यामुळे कानपूर कसोटीत त्याच्याशिवाय खेळण्याची तयारी बांगलादेश संघाने सुरू केली आहे. सर्वात अनुभवी असलेला अष्टपैलू खेळाडू आजही बांगलादेश संघाचा कणा मानला जातो. जर तो कसोटीत उतरू शकला नाही तर हा बांगलादेशसाठी खूप मोठा धक्का ठरणार आहे. आधीच त्यांना पहिली कसोटी गमवावी लागली आहे आणि कानपूर कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचे बांगलादेशचे मनसुबे आधीच उधळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.