बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर आता मुंबई पोलीस या प्रकरणी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पोहोचले. या प्रकरणी आता मोठे अपडेट समोर आली आहे.
रायपूरमध्ये मुंबई पोलिसांच्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीच्या मोबाईलवरुन वांद्रे पोलीस स्टेशनच्या लॅण्ड लाईनवर शाहरुख खानला धमकीचा फोन आला त्याचा मोबाईल चोरी झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, फैजान खान नावाच्या व्यक्तीने मुंबई पोलीसांना सांगितले की, त्याने आपला मोबाईल चोरी झाल्याची तक्रारही दाखल केली आहे. पोलीस आता त्या मोबाईल चोराचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजान व्यवसायाने वकिल आहे. पोलिसांनी फैजानचा जबाब नोंदवला आहे, फैजानने पोलिसांना सर्व माहिती दिली आहे. फैजान आधी लालबाग येथे राहत होता. आता तो रायपूर कोर्टात प्रॅक्टीस करतो. मुंबई पोलिसांनी आणि रायपूरच्या सायबर टीमने आरोपी फैजानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. मुंबई पोलिसांकडून आरोपीलानोटीस पाठवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असून हा फोन कोणाच्या सांगण्यावरून केला होता. या मागे कोणती टोळी तर नाही ना की, खंडणी मागण्यामागे काय उद्देश आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासली जात आहेत.
याप्रकरणी पोलीस अधिकारी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे येथे शाखरुख खान याला धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याबाबत मुंबई पोलीस रायपुर येथे चौकशीसाठी गेले आहेत. पोलिसांनी पंडरी परिसरात एकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.