पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने टाकलेल्या निर्बंधांमुळेही पाकिस्तानवर भुकेकंगालीची वेळ आली आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सर्व सरकारी कंपन्या विकणार असल्याची घोषणा केली. उद्योगधंदा करणे हे सरकारचे काम नाही, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान सरकारने सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी खास आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान शरीफ बोलत होते. खासगीकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पाकिस्तान सरकारच्या मालकीच्या एकुण 88 कंपन्या आहेत. या कंपन्या नफ्यात चालत असल्या तरी सरकार आता यापुढे त्या चालवणार नाही, असे शरीफ यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांचा लिलाव ‘लाईव्ह’ करणार
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पथकाचा दौरा पूर्ण होताच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी कंपन्यांच्या विक्रीची घोषणा केली. कंपन्यांच्या लिलावाची प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. लिलाव प्रक्रियेचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 24 कंपन्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान शरीफ यांनी सांगितले. लिलावात पहिला क्रमांक पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचा लावण्यात आला आहे. त्यानंतर पाकिस्तानातील वीज कंपन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारने एअरपोर्ट आणि बंदरे यापूर्वीच लिलावात काढली आहेत.