बॉलीवूड किंग खानच्या अभिनयाबरोबरच त्याच्या मन्नत बंगल्याचेही चाहत्यांना विशेष आकर्षण आहे. मुंबईत येणारा प्रत्येकजण हा बंगला पाहायला हमखास तिथे जातो. अशातच आता बातमी समोर येत आहे की, शाहरुख खान आणि गौरी त्यांचा मन्नत बंगला आणखी भव्य करायचा आहे. त्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानने नुकतेच महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीला मन्नत बंगल्याचे दोन मजले वाढविण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. एमसीझेडएमएच्या 10-11 डिसेंबरच्या बैठकीच्या अजेंड्याचा भाग असलेल्या या अर्जामध्ये 25 कोटी रुपये खर्चून सातव्या आणि आठव्या मजल्याच्या बांधकामाचा प्रस्ताव आहे. अर्जाचे पुनरावलोकन सुरू असताना, हे मजले का वाढविण्यात येत आहेत, त्याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शाहरुख खानचा मन्नत बंगला हा केवळ बंगला नसून तो सुसज्ज सुविधांनी परिपूर्ण असा आहे. 27 हजार स्क्वेअर फुट पसरलेला ही आलिशान प्रॉपर्टी आहे. यामध्ये पाच बेडरुम, एक खासगी मूव्ही थिएटर, फिटनेस सेंटर स्विमिंग पूल, आलिशान वाचनालय, अंगण आहे. या बंगल्यांची सध्याची किंमत 300 कोटी आहे. शाहरुखचे अनेक चाहते मन्नतच्या बाहेर उभे राहून या घराचा फोटो घेतात.