पहिल्याच दिवशी विश्वविक्रमांचा पाऊस; शेफालीचे झंझावाती विक्रमी द्विशतक

स्मृतीसह विश्वविक्रमी सलामी एका दिवसात 525 धावांचा डोंगर

आज चिदंबरम स्टेडियमवर हिंदुस्थानच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मनधानाच्या बॅटीने अक्षरशः विश्वविक्रमांचा पाऊस पाडला. एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचे ‘पानिपत’ केल्यानंतर आजपासून सुरू झालेल्या एकमेव कसोटीत शेफाली वर्मा आणि स्मृती मनधानाने झंझावाती शतकांसह पहिल्याच दिवशी 4 बाद 525 विश्वविक्रमी धावांचा डोंगर उभारला.

आजपर्यंत कोणत्याही पुरुष क्रिकेट संघाला जी कामगिरी करता आली नाही ती कामगिरी शेफाली-स्मृतीने करून दाखवली. शेफालीने महिला कसोटी विश्वातील वेगवान द्विशतक ठोकण्याचा विक्रम रचताना 194 चेंडूंतच ही कामगिरी साकारली. त्याचबरोबर सर्वाधिक षटकारांचा, विश्वविक्रमी सलामीचा, एका दिवसात सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रचण्याचा इतिहास शेफाली- स्मृती या सलामीच्या फलंदाजांनी करून दाखवला. हिंदुस्थानचा संघ नाणेफेक जिंकून मैदानात उतरला आणि सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मनधाना दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर तुटून पडली. दोघींनी पहिल्या सत्रात 130 धावांची भागी केली होती, मात्र दुसऱया सत्रात त्यांनी चौकार-षटकारांची बरसात करत 32 षटकांत 204 धावा चोपून काढल्या. दुसऱया सत्रातच दोघींनी आपली शतके साजरी केली. पहिल्या विकेटसाठी 292 धावांची विश्वविक्रमी भागी रचल्यानंतर स्मृती 149 धावांवर बाद झाली. मात्र तिच्यानंतर तिसऱया सत्रात शेफालीने आपले द्विशतक 198 चेंडूंत साकारले. याआधी 248 चेंडूंत अॅनाबेल सदरलॅण्डने द्विशतक पूर्ण केले होते. द्विशतक साकारताच शेफाली 205 धावांवर बाद झाली. तिने या खेळीत 8 षटकार आणि 23 चौकार लगावले.

या दोघींच्या झंझावातानंतर तिसऱ्या सत्रातही हिंदुस्थानने 189 धावा काढत एका दिवसात 525 धावांचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. याआधी एका दिवसांत श्रीलंकेच्या पुरुष संघाने 2002 साली बांगलादेशविरुद्ध 9 बाद 509 अशी मजल मारली होती. तो विक्रम आज हिंदुस्थानच्या महिलांनी मोडीत काढला. तसेच महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका दिवशी 500 पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर (42) आणि रिचा घोष (43) या खेळत होत्या.

शेफालीचे विक्रमामागून विक्रम
शेफालीने आज आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. कसोटी क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर द्विशतक झळकावणारी ती दुसरी हिंदुस्थानी महिला क्रिकेटपटू ठरली. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या युवा महिला क्रिकेटपटूंमध्ये शेफालीने (20 वर्षे व 152 दिवस) दुसरे स्थान पटकावले. मिताली (19 वर्षे व 254 दिवस वि. इंग्लंड 2002) या विक्रमात अव्वल आहे.