कुर्ला एसटी डेपोत हृदयद्रावक घटना, खेळताना खड्ड्यात पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बांधकामासाठी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कुर्ला डेपोत घडली. उज्वल रबी सिंग असे मयत मुलाचे नाव आहे. नेहरु नगर एसटी डेपोमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उज्वल मित्रांसोबत एसटी डेपेच्या आवारात खेळायला गेला होता. एसटी डेपोच्या आवारात बांधकाम सुरू असल्याने खड्डा खणण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी भरले होते. खेळता खेळता उज्वल या खड्ड्यात पडला आणि पाण्यात बुडाला.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ त्याला पाण्यातून बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन महिन्यांपूर्वीच मुलाच्या वडिलांचे निधन झाले. नेहरुनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.