शिक्रापुरात एकाच ठिकाणी आढळली नागाची सात पिले

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका ठिकाणी खड्ड्यामध्ये नागाची सात पिले आढळून आली असून, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या प्राणिमित्रांकडून त्या नागाच्या पिलांना जीवदान देण्यात आले आहे. शिक्रापूर येथील साईसमर्थ नगर येथे सुजित विरोळे यांच्या कोंबड्यांच्या शेडजवळ एक नागाचे पिल्लू असल्याचे दिसल्याने सर्पमित्र अमोल कुसाळकर व शुभम माने त्या ठिकाणी गेले असता, त्यांना नागाची तीन पिले दिसल्याने त्यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, शुभम वाघ यांना बोलावून घेतले.

यावेळी सर्पमित्रांनी पाहणी केली असता, तब्बल नागाची सात पिल्ले दिसली. दरम्यान, सर्पमित्रांनी त्या पिलांना पकडले. यावेळी बोलताना सध्या नाग व घोणसाच्या पिलांचा जन्म होत असून, येथे असलेल्या माती व विटांच्या ढिगाऱ्यालगत एखाद्या नागाने अंडी घातलेली असून, त्यातून या पिलांचा जन्म झाल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. दरम्यान, या नागाच्या पिलांची माहिती शिरूर वन परिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे व नियत क्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना देत सर्व पिलांना निसर्गात मुक्त करण्यात आले.