हरयाणात जत्रेला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, कार कालव्यात बुडून 8 जणांचा मृत्यू

देशभरात उत्साहात दसरा साजरा करण्यात आला. मात्र हरयाणात दसऱ्याच्या सणाला गालबोट लावणारी घटना घडली. जत्रेला चाललेल्या कुटुंबाचा वाटेतच करुण अंत झाल्याची घटना हरयाणातील कैथलमध्ये घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि चार मुलींचा समावेश आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कार चालक यातून बचावला आहे.

सतविंदर, चमेली, तीजो, फिजा, वंदना, रिया, कोमल आणि रमनदीप अशी मयतांची नावे असून त्या डीग गावातील एकाच कुटुंबातील रहिवासी होत्या. सर्वजणी चालकासोबत जत्रेला चालल्या होत्या.

दसऱ्यानिमित्त गुहणा गावात बाबा राजपुरी जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जत्रेत सहभागी होण्यासाठी एका कुटुंबातील तीन महिला आणि चार लहान मुली चालकासोबत कारने चालल्या होत्या. मात्र मुंदरी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् कार थेट कालव्यात पडली. यात कारमधील आठ जणींचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.