जिल्हा परिषदेचे माजी सात सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असून, आमदारकीसाठी नशीब आजमावत आहेत. यामध्ये तीन जणांनी थेट बंडखोरी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहातून कोण कोण विधानसभेच्या सभागृहात जाणार याकडे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्यांमधून अनेक आमदार विधानसभेत गेले, राज्यमंत्रीदेखील झाले. यावेळेसदेखील काही पंचायत समितीचे माजी सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांमधून विधानसभेत जाण्याची प्रत्येक निवडणुकीतील परंपरा राहिली आहे. यावेळी ही संधी कोणाला मिळणार याची चर्चा आहे.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य राहिलेले बाबाजी काळे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, ते महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत. जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे वंचित आघाडीकडून तसेच चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या
आशाताई बुचके या अपक्ष उमेदवार आहेत.
इंदापूरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी अपक्ष झेंडा हाती घेतला आहे. शिरूरमध्ये अजित पवार गटाकडून माउली कटके तर भोर विधानसभा मतदारसंघात मुळशीमधील जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर हे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. याशिवाय भोरमध्ये अपक्ष म्हणून माजी सदस्य कुलदीप कोंडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य राहिलेले अनेकजण आमदार झाले. त्यातील अनेकजण पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री आमदार दत्तामामा भरणे, वडगाव शेरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार बापूसाहेब पठारे, खेड विधानसभेत महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते, पंचायत समिती सदस्य राहिलेले भोरचे आमदार संग्राम थोपटे, शिरूरमध्ये अशोक पवार हेदेखील रिंगणात आहेत.