संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा! आज आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन

अनुसूचित जातीपैकी ढोर कक्कया समाज गेल्या 50 वर्षे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱया विविध योजना आणि सवलतींपासून वंचित आहे. खासगीकरणामुळे त्यांचा मूळ कातडय़ांपासून विविध वस्तू बनवण्याचा व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यामुळे उद्योगासाठी भांडवल मिळत नाही आणि मुलांना उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी वीरशैव कक्कया कल्याण मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आझाद मैदानात शुक्रवार, 28 जूनला एक दिवसाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती जमातींसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. वीरशैव कक्कया ढोर जातीसाठीही अशा प्रकारे महामंडळ स्थापन करून न्याय द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर चांदबोधले यांनी दिली. दरम्यान, या मागणीबरोबरच ढोर कक्कया समाजाची स्वतंत्र जनजणना करावी, कक्कया ढोर जातीचा दाखला देताना 1950 चा अन्य राज्यांचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा आणि ज्या ठिकाणी 15 वर्षांचे वास्तव आहे अशा व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना राहत असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकाऱयांनी जातीचा दाखला द्यावा, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून द्यावे, सरकारी विभागात चर्म वस्तू विक्रीसाठी टेंडरमध्ये ढोर समाज व्यक्तींसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावे, नाविन्य वस्तू बनवण्यासाठी प्रशिक्षण पेंद्राची स्थापना करावी, प्रत्येक जिह्यात एक समाज मंदिर हॉल बांधून द्यावा, अशा मागण्याही वीरशैव कक्कया कल्याण मंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.