शेअर मार्केटमध्ये धडाम… सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरला

मागील आठवडय़ात शेअर बाजारात धुमधडाका होता. सेन्सेक्स आणि निफ्टीने जवळपास दररोज नवनवे रेकॉर्ड बनवले, पण या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी या तेजीला ब्रेक लागला आणि दोन्ही निर्देशांक घसरले. बीएसई निर्देशांक 700 हून अधिक अंशांनी घसरला, तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीने 140 अंकांची घसरण नोंदवली. पुढे ही पडझड सुरूच राहिली. एकीकडे बीएसई सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला, तर निफ्टीही 300 अंकांपर्यंत खाली आले. यामुळे गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सोमवारी मार्केट सुरू होताच बीएसई आणि निफ्टी घसरले. सुरुवातीला बीएसई निर्देशांक 85208 वर होता. काही मिनिटांतच तो 744.99 अंकांनी घसरून 84824.86 च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी 26061 वर उघडला. निफ्टीचा निर्देशांक 211.75 अंकांनी घसरून 25967.20 च्या पातळीवर पोहोचला.

बीएसईवरील टॉप 30 लार्ज कॅप कंपन्यांपैकी 23 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. म्हणजेच त्यात मोठी घसरण झाली. आयसीआयसीआय बँकेचा शेअर जास्त घसरला आणि तो 1.80 टक्क्यांच्या घसरणीसह 1283 रुपयांवर पोहोचला. याशिवाय ऑक्सिस बँकेचा शेअर 1.63 टक्क्यांनी घसरून 1251.40 वर पोहोचला. मुकेश अंबानींच्या रिलायन्सच्या शेअरमध्येही 1.81 टक्क्यांनी घट होऊन तो 2997 रुपयांवर पोहोचला. टाटा मोटर्सचा शेअर 1.20 टक्क्यांनी खाली येऊन 980 रुपयांवर आला.