शेअर बाजार घसरला, गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात बुधवारी चढ-उतार पाहायला मिळाला. परंतु, अखेरच्या काही तासांत बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 168 अंकांच्या घसरणीसोबत 81 हजार 467 अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 31 अंकांच्या घसरणीसोबत 24,982 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली असली तरी गुंतवणूकदारांना मात्र याचा फटका बसला नाही. उलट गुंतवणूकदारांना 2.63 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.

सेन्सेक्समध्ये आयटीसी, नेस्ले इंडिया, एचयूएल इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एसबीआय, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या बळावर शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर सुद्धा गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 2.63 लाख कोटी रुपये वाढून 462.14 लाख कोटी रुपये झाले.