ट्रम्प थोडक्यात बचावले, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा केले लक्ष्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार  डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 64 दिवसांनंतर पुन्हा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त असून ट्रम्प थोडक्यात बचावले. ट्रम्प गोल्फ क्लबमध्ये खेळत असताना सीक्रेट सर्व्हिस एजंटना आजूबाजूच्या झाडीत एक संशयित लपलेला आढळला. त्याच्याजवळ एके 47 सारखी रायफल आणि गो प्रो कॅमेरा होता. त्याचा निशाणा गोल्फ कोर्सच्या दिशेने होता. ट्रम्प आणि हल्लेखोर यांच्यात 300 ते 500 मीटर इतके अंतर होते. या संशयिताला पाहताच सीक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांनी त्याच्या दिशेने फायरिंग केली. त्यामुळे
हा संशयित एसयूव्हीमधून फरार झाला.

 यादरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने या गाडीचा फोटो घेतला. त्याच्यावरील नंबर प्लेटच्या माध्यमातून सीव्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांनी या गाडीचा पाठलाग केला आणि गोल्फ कोर्सपासून 60 किलोमीटर अंतरावर या संशयित हल्लेखोराला अटक केली. दरम्यान, याआधी 13 जुलै रोजी अमेरिकेतील केंसिल्वेनियाच्या बटलर शहरात निवडणूक प्रचार सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली होत. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले होते.

गोल्फ क्लबमध्ये जाणे प्लॅनमध्ये नव्हते

ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार रविवारी दुपारी 2 वाजता हल्ल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाचा तपास एफबीआय करत आहे. एफबीआयने ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्लॅन होता असा दावा केला आहे. संशयित हल्लेखोराची कसून चौकशी केली जात आहे. गोल्फ क्लबमध्ये जाणे ट्रम्प यांच्या प्लॅनमध्ये नव्हते. अखेरच्या क्षणाला ट्रम्प यांच्या दिनक्रमात गोल्फ क्लबमध्ये जाण्याचे ठरले.  रयान रॉथ (58) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.

हल्लेखोर कोण?

ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव रायन वेल्सी रुथ असे असून तो बांधकाम कामगार होता. त्याची कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नाही. परंतु, त्याने युक्रेन-रशिया युद्धात सहभागी होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. युव्रेनमध्ये लढण्याची आणि मरण्याची तयारी असल्याची पोस्ट त्याने एक्सवरून केली होती.

मी सुरक्षित; कधीच हार मानणार नाही

या घटनेनंतर ट्रम्प यांनी समर्थकांसाठी एक संदेश जारी केला आहे. मी सुरक्षित आहे. मी माझ्या आसपास गोळीबाराचा आवाज ऐकला; परंतु, अफवा पसरवू नका. मी सुरक्षित आहे आणि कधीच हार मानणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मला पुणीच निवडणूक प्रचार करण्यापासून रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, सीक्रेट सर्व्हिस, शेरिफ रिक ब्रॅडशॉ आणि इतर सर्वांचे ट्रम्प यांनी आभार मानले.