महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि थोरात यांच्यात चर्चा

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यात यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप आणि काँग्रेस उमेदवारांची यादी याबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक आज पार पडली. याच बैठकीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर चेन्नीथला यांनी माहिती दिली. उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल. मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम जागावाटप जाहीर केले जाईल. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात समन्वयक असतील, असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र आहोत, असेही त्यांनी नमूद केले. बाळासाहेब थोरात व काँग्रेस नेते उद्या सकाळी शरद पवार यांना भेटतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील.