नेमाडे यांच्या ‘कोसला’वर सिनेमा; सयाजी शिंदे साकारणार मुख्य भूमिका

भालचंद्र नेमाडे लिखित ’कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. या तरुणाचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी आता चित्रपटाच्या माध्यमातून मोठया पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच ’कोसला – शंभरातील नव्याण्णवांस…’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे उपस्थित होते.

आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘‘साहित्याइतकेच माझे चित्रपटांवरही प्रेम आहे. सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ‘कोसला’ साठी अनेक जण मला भेटले, परंतु त्यांना ते जमले नाही. परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यामुळे मला उभारी मिळाली. पुढच्या कादंबऱया लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिला आहे.’’

 1963 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरिया भाषेत अनुवादित करण्यात आली. त्यामुळे या कादंबरीची ओळख केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. 2014 मध्ये डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा 50 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.