पाच वर्षे तोंड दाखवले नाही, यापुढे गावात येऊच नका! दीपक केसरकरांना मालवणी हिसका

शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांच्या वळचणीला गेलेले विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी चांगलाच मालवणी दणका दिला आहे. गावागावात फलक लावून त्यांच्या निष्क्रियतेचा पाढा मतदार वाचत आहेत. गेल्या पाच वर्षांत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न केलेल्या केसरकर यांना भाई, आता खराच पुरे झाला, थांबा आता…!! असा सल्लावजा इशारा थेट मालवणी भाषेतूनच फलक लावून दिला आहे.

वेंगुर्ला, म्हापण, परुळे, भोगवे परिसरात हे फलक लावण्यात आले आहेत. त्यावर केसरकर यांचे व्यंगचित्रही आहे. ‘म्हापण, पाट परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतंत काय वो. कशी आठवतीत. 5 वर्सा झाली तुमका हय येवंन. इसारला असतलास. आमीव इसारलंव तुमी 15 वर्सा आमचे आमदार आसास ते. मागच्या निवडणुकीत चिपी विमानतळार दोन हजार पोरा-पोरींका नोकरी देतलास असा सांगितलास, पन पाच वर्षात एकाव माणसाक नोकरी काय लागाक नाय, पण असले एक एक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास’ असा चिमटा काढणारा मजकूर त्या फलकांवर लिहिण्यात आला आहे.

‘त्येच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टस्, स्थानिकांका हाटेला घालूक अनुदान, पर्यटनातून रोजगार अशे गजाली मारलास, आमी खुष झाल्लंव आनी मता घातलंव. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.’ अशा शब्दांत मतदारांनी केसरकर यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे.

‘पाच वर्षात जसा आमका तोंड दाखवक नाय तसे हेच्या पुढेव येव नको. आता कोपरापासून हात जोडून सांगतवं तुमका…!!’ असा इशाराही केसरकर यांना देण्यात आला आहे. प्रत्येक फलकावर वेगवेगळे मुद्दे मतदारांनी मांडले आहेत. वेंगुर्ल्यातील फलकावर वेंगुर्ले तालुका पर्यटन नकाशावर पोहोचवू शकला नाहीत, पण शेजारचा मालवण मात्र पोहोचला हेसुध्दा मतदारांनी केसरकरांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच किती दिवस मतदारसंघात फिरकला नाहीत त्याचा जाबही मतदारांनी विचारला आहे.