अदानीची संपत्ती म्हणजे मोदींचीच दौलत, सत्यपाल मलिक यांचा घणाघात

भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि प्रचंड महागाईमुळे देश देशोधडीला लागला आहे. देशात गोरगरीबांची नाही तर फक्त अदानीची संपत्ती वाढत आहे. मोदी सरकारने अख्खा देशच अदानीकडे गहाण टाकलाय. मी तर म्हणेन की, ‘अदानीची संपत्ती म्हणजे मोदींचीच दौलत!’ असा जबरदस्त घणाघात आज माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी केला.

‘निर्धार महाराष्ट्राचा आणि भारत जोडो अभियान’च्या वतीने आज नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. या जनसभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जम्मू-कश्मीर, गोवा आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी केंद्र सरकारच्या जनसामान्यविरोधी धोरणांचा पाढा वाचताना भाजपच्या गलिच्छ राजकारणाची पोलखोलच केली. भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या राज्यात अदानीची संपत्ती वाढल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. पुलवामा हल्ला, दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन, राज्यपाल म्हणून सतत होणाऱ्या बदल्या यावर भाष्य केले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नसतील त्यापेक्षा अधिक माझ्या बदल्या झाल्या. त्यांच्या प्रस्तावांना विरोध केल्यामुळे पाचवेळा राज्यपाल पदावरून माझ्या बदल्या झाले असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, भारत जोडो अभियानच्या संयोजक उल्का महाजन, सपाचे आमदार अबू आजमी, पुलवामा टूथ मुव्हमेंटचे संयोजक फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह तुषार गांधी, शाम गायकवाड, शेतकरी नेते सुनीलम उपस्थित होते.

महाराष्ट्रात पराभवाची भीती

देशात सध्या मोठी लढाई सुरू आहे. ही लढाई जिंकण्याच्या जवळ आपण आहोत, असेही मलीक म्हणाले. हरयाणा अणि महाराष्ट्राची निवडणूक एकत्र होणे अपेक्षित होते. मात्र हरयाणात भाजपला केवळ 20 तर काँग्रेसला 60 जागा मिळतील अशी स्थिती आहे. याच पराभवाच्या भीतीने हरयाणासोबत महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. आता त्यांचे अंतिम दिवस आले आहेत आणि महाराष्ट्रच त्यांचा पराभव करून देशाला दिशा दाखवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर सरकारने राजीनामा दिल्या नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणून बदली

गोव्यात राज्यपाल असताना भ्रष्टाचाराची तक्रार केली असता मोदींनी स्वत: मला फोन करून सांगितले की तुमची माहिती चुकीची आहे. मुख्यमंत्री कार्यालयात बसून पैसे घेणाऱ्यांकडून तुम्ही ही माहिती घेतल्याचे मोदींना मी सांगितले. पण पैसे घेणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी तिसऱ्या दिवशी गोव्याच्या राज्यपालपदावरून मला बाजूला केल्याचे ते म्हणाले. सत्तेसाठी भाजप सरकार समाजांमध्ये तेढ निर्माण करीत आहे. हिंदू-मुस्लीम दंगली घडवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पुलवामा हल्ल्याची चौकशी कधी करणार?

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी मला गप्प राहाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर अजित डोवाल यांचाही फोन आला आणि मला यावर भाष्य करू नये असे सांगितले. वास्तविक सीआरपीएफने जवानांना नेण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. पण गृहमंत्रालयाने विमानांच्या मागणीसाठी केलेला अर्ज फेटाळून लावला. विमान न दिल्याने जवानांचा ताफा रस्त्याने गेला आणि त्यात चाळीस जवान मारले गेले. अजूनही या जवानांच्या विधवा महिला न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. या घटनेनंतर त्यांनी पुलवामा घटनेला निवडणूक प्रचाराचा मुद्दा केल्याचे सांगत पुलवामा प्रकरणाची चौकशी कधी करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गोधरा म्हणजे पुलवामाचा पहिला प्रकार संजय राऊत

पुलवामा दुर्घटने विषयी मलिक राज्यपालपदी असताना काहीच बोलले नसते तर या घटनेचे सत्य देशातील लोकांना समजले नसते. देशातील निवडणुका जिंकण्यासाठी जवानांचे बळी घेतले जातात हेही कळले नसते. लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी पराभूत आहेत. पण जिल्हाधिकाऱ्यांना धमकावून त्यांनी भाजपच्या जागा वाढवून घेतल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हे प्रकार झाले पण महाराष्ट्रातील प्रकार आम्ही हाणून पाडले. राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान पदावर बसलेल्या मोदी यांचा नैतिकतेशी काही संबंध नाही. गुजरात मधील गोधरा प्रकरण म्हणजेच पुलवामाचा हा पहिला प्रकार होता, असेही संजय राऊत म्हणाले.

लोक तुम्हाला मतांतून मारतील

दिल्लीतील सरकार लुळे असल्याचे ते म्हणाले. पंजाब दौऱ्यात असताना आंदोलकांना घाबरून आपल्यावर हल्ला होणार असल्याचा कांगावा मोदींनी नाहक केल्याचे ते म्हणाले. लोक तुम्हाला मारण्यासाठी काडतूस वाया घालवणार नाहीत, तर ‘मतां’मधूनच लोक तुम्हाला मारतील, सत्तेवरून खाली खेचतील असा टोलाही त्यांनी लगावला. ईश्वराच्या कृपेने ही ताकद जनतेमध्ये आहे, असे ते म्हणाले.

जम्मूकश्मीरमध्ये राज्यपाल असताना अंबानींचे एक प्रकरण माझ्याकडे आले. पण ते चुकीचे असल्याने मी फेटाळून लावले. तेव्हा सेक्रेटरीने सांगितले की, यामध्ये 150 कोटी रुपये मिळू शकतील. पण आपण याला नकार दिला. मी अंबानींचा हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे मोदी माझ्या विरोधात गेले. – सत्यपाल मलिक