महापूरकाळात मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यायला हवे होते!

लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री शिंदे सहा-सहा दिवस कोल्हापुरात तळ ठोकून होते; पण आता महापुरासारख्या आपत्तीत सांगली आणि कोल्हापूरकडे त्यांनी पाठ फिरविली. पूरस्थितीत मुख्यमंत्र्यांनी किमान एक दिवसाचा तरी दौरा करायला हवा होता, अशी खरमरीत टीका महाविकास आघाडीचे नेते-काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. गेले 14 दिवस पाण्याची पातळी कमी होत नव्हती. त्यामुळे याबाबत उपाययोजनांसह भविष्यात पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी होती, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे हे 9 ऑगस्टला कोल्हापुरात येत आहेत. याबाबत बोलताना, मराठा आरक्षणावर सरकारने भूमिका घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासह सगेसोयऱयांबाबत जीआर काढण्याचा शब्द सरकारने नवी मुंबई येथे दिला होता. सरकार जर याचे क्रेडिट घ्यायला पुढे येत असेल, तर आरक्षणाचा प्रश्नदेखील त्यांनी मार्गी लावायला पाहिजे होता, असे सतेज पाटील सांगितले.

बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना हे हुकूमशाहीचे द्योतक असून, विरोधी पक्षांना संपविण्याचा प्रयत्न, विरोधकांना जेलमध्ये घालणे अशा हुकूमशाहीचाच हा स्फोट असल्याचे सतेज पाटील म्हणाले. कोल्हापुरातील 15 लोक बांगलादेशात असून, ते सध्या सुखरूप आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आपण त्याची माहिती उघड करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. बांगलादेशात असलेल्या या लोकांना सरकारने सुखरूपरीत्या परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आपणही पाठपुरावा करू, असे सतेज पाटील म्हणाले.

खासदार महाडिक लोकांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध

बंगळुरू महामार्गावर टोलमाफीसाठी आंदोलन केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या हितासाठी आंदोलन केले तर गुन्हे दाखल करणार हे सरकारचे धोरण दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. टोलमाफीच्या आंदोलनावरून खासदार धनंजय महाडिक यांची टीका म्हणजे ते लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने नसल्याचे सिद्ध होत असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली.