कृषी महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडमध्ये आले असता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीरपणे बंडाची बिजे पेरली. सातारच्या राजांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हा, अशी गळच भरकार्यक्रमात घातली. त्यामुळे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेल्या मिंधे आणि दादा गटाची अस्वस्थता वाढली आहे.
राजेंनी आधी फडणवीसांना बैलगाडीवरून सैर घडवली आणि नंतर व्यासपीठावरून बंडाची बीजपेरणी केली. ‘मगाशी बैलगाडीत बसल्यानंतर फडणवीसांनी कासरा पकडला. तेव्हा मी त्यांना सांगितले, ही सुरुवात आहे. यापुढच्या काळात तुम्हाला राज्याचा कासरा हाती घ्यावा लागणार आहे. ही आम्हा सगळय़ांची मनापासून इच्छा आहे’, असे सांगत फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री व्हा, अशी गळ राजेंनी घातली. त्यावर स्मितहास्य करत फडणवीसांनी सूचक मौन पाळलं.
महाविकास आघाडी जिंकेल!
उदयनराजे भोसले यांनी भाषणात महाविकास आघाडी जिंकेल असे सांगितले. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘आपली महायुती आहे हे लक्षात ठेवा. आता वृत्तवाहिन्या तेवढेच पकडून तेच दाखवतील’.
आम्हाला राखीव ठेऊ नका!
कराडचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सज्ज झाल्यानंतर जो पहिला रणजी सामना होईल तेव्हा टीमचे क@प्टन म्हणून तुम्ही इथे या. आम्ही तुमचे मित्र आहोत. तुमच्या टीमध्ये आम्हाला घ्या. राखीव ठेऊ नका म्हणजे झाले, असे उदयनराजे म्हणाले. त्यावर ‘उदयनराजे ही रणजी नव्हे तर आयपीएलची टीम आहे. या टीमचे ते मालक आहेत. कोणाला टीममध्ये ठेवायचे, कोणाला बाहेर ठेवायचे हे तेच ठरवतात’, असे फडणवीस म्हणाले.