सरफराज खानचा शिवसेनेकडून सन्मान

बंगळुरू कसोटीत हिंदुस्थानी संघाकडून झुंजार शतकी खेळी करणाऱ्या धडाकेबाज सरफराज खानचा शिवसेनेने सन्मान केला. कुर्ला येथील टॅक्सीमेन्स कॉलनी येथे निवासस्थानी भेट घेऊन शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी सरफराजचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सरफराज खानने खडतर प्रवास करून हिंदुस्थानी कसोटी संघात स्थान मिळवले. या प्रवासात त्याला नेहमीच शिवसेनेची साथ मिळाली. सांताक्रुझ येथील एअर इंडिया मैदानाच्या नेटमध्ये गेली 10-12 वर्षे सरफराज सराव करत आला आहे. त्याचा बंधू मुशीर हासुद्धा क्रिकेटमध्ये यशस्वी वाटचाल करत असून वडील नौशाद हे या दोघांचे गुरू आहेत.

या कुटुंबाच्या शिवसेना नेहमीच पाठीशी राहिली असून सरफराज चार दिवसांची विशेष सुट्टी घेऊन घरी आला असता त्याची भेट घेऊन शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी त्याचे कौतुक केले व त्याला खास शुभेच्छा दिल्या. मुशीर काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाला होता त्याचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी विधानसभा प्रमुख शोभन तेंडुलकर, शाखाप्रमुख जितेंद्र अणेराव, विलास मोरे, महिला उपविभाग संघटक गीता मोरे, शाखा संघटक श्वेता संसारे व अन्य पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.