सांताक्रुझच्या आगीत एकाचा मृत्यू

सांताक्रुझ पूर्व सुंदरनगर येथे शुक्रवारी मध्यरात्री एका इमारतीला लागलेल्या आगीत एका वृद्धाचा मृत्यू झाला. लखू पटेल (85) असे या मृताचे नाव आहे.

सुंदर नगर येथील प्राइड ऑफ कलीना या तळ अधिक सात मजली इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील रूम नंबर 303 मध्ये शुक्रवारी मध्यरात्री 1.30 वाजम्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रहिवाशांनी इमारतीतील अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच पटेल यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन दलाचे जवानही आवश्यक साधनसामग्रीसह दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र या आगीत लखू पटेल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही आग इलेक्ट्रिक बोर्डमधून लागली असून त्यात सर्व इलेक्ट्रिक वायरिंग, घरातील लाकडी फर्निचर जळून खाक झाले आहे. मृताचे कुटुंबीय वेगळय़ा ठिकाणी राहत आहेत. त्यांनी पटेल यांच्यासाठी एक कामगार नियुक्त केला होता. तो दिवसा त्यांच्या सेवेसाठी येत असे. पटेल रात्री एकटेच राहायचे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.