संजीवनी भेलांडे यांना लतादीदी पुरस्कार; हृदयनाथ मंगेशकर यांची घोषणा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबर रोजी 95वा जन्मदिवस आहे. या दिवशी यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरूड, पुणे येथे सायंकाळी 5.30 वाजता एक अनोखा कार्यक्रम पंडित हृदयनाथ मंगेशकर सादर करणार आहेत. यनिमित्ताने लतादीदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यंदा हा पुरस्कार पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांना दिला जाणार आहे. एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पुण्यात आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या वेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, संजीवनी भेलांडे यांना मी त्यांच्या लहानपणापासून ओळखत आहे. त्यांनी आपल्या दैवी आवाजाने जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गायिका संजीवनी भेलांडे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, ‘लताजी माझ्या वेद, उपनिषद, गीता आणि कुराण आहेत. आयुष्याच्या मोठय़ा विद्यापीठात मी नेहमीच त्यांची विद्यार्थी होते.’