गद्दारांना नष्ट करण्यासाठी कामाला लागा; शिवसेना मेळाव्यात संजय राऊत यांचे आवाहन

देशात न्याय, राज भवन, संविधान गुलाम झाले असून एक प्रकारे हुकूमशाही सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. देशाचे पोट भरत होती ती मुंबई हे लुटत आहेत. ते मुंबईचा सूड घेत असून मुंबईच्या न्याय्य हक्कांसाठी आता आपण लढले पाहिजे. प्रभू श्रीराम सत्याच्या बाजूने असतात आणि सत्य आपल्याकडे आहे. हनुमानासारखे रामभक्तही आहेत; त्यामुळे गदाही आपल्याकडे आहे. आता गद्दारांविरुद्ध लढाई करायची आहे, त्यांना नष्ट करायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांचा मेळावा आज नगर येथे झाला. या वेळी खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. नगर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विजय औटी, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, संदेश कार्ले, गिरीश जाधव, युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर रोहिणी शेंडगे, सुजाता कदम, अशोक गायकवाड, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, पुष्पा बोरुडे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कारसेवा करत त्या वेळी अयोध्येला गेलेले शिवसैनिक अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, गोरख दळवी यांचा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

देशातील शेतकरी सुखी नाही, त्याच्या मालाला भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, अवास्तव महागाई वाढत चालली असून यावर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत. आता ते रामासमोर रडत आहेत. राम मंदिर झाले याचा आनंदच व्हायला पाहिजे; पण यांना रडू येत आहे. मग पुलवामा येथे 40 सैनिक मारले गेले, कश्मीरमध्ये पंडित मारले गेले, शेतकऱयांच्या आत्महत्या वाढत आहेत, अशा वेळी त्यांच्या डोळय़ांतून अश्रू का आले नाहीत. आता मूर्ती बघून नाटक का करता, जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा. श्रीरामाचे नाव घ्या, उत्सव करा; पण श्रीराम हे तुमच्या एकटय़ाचे नाहीत, हेही लक्षात ठेवा. तुम्ही श्रीरामाच्या नावावर मते मागता, तुम्हाला ते मत कोणीही देणार नाही, असा इशारा खासदार राऊत यांनी दिला. दरम्यान, राज्यातील सरकार हे औटघटकेचे सरकार असून हे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

300 युवकांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर आणि जिह्यातील 300हून अधिक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. अशोक पारधे, रुपेश गायकवाड, साजिद सय्यद, अमोल पाडळे, अन्सार शेख, पोपट रोकडे, राजू शिंदे, प्रकाश गाडे, सचिन साळवे, सागर रोकडे, सागर पारधे, संतोष साळवे, सोनू सय्यद यांच्यासह युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.