महाराष्ट्रात ऑनलाइन लॉटरीवर तातडीने बंदी घाला, संजय राऊत यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

मुंबईसह महाराष्ट्रात ‘ऑनलाईन लॉटरी’च्या रूपाने जुगाराचे नवे अड्डे बेकायदेशीरपणे चालविले जात आहेत. या जुगारामुळे रोज हजारो मराठी कुटुंबे उद्ध्वस्त होत असून कित्येक तरुणांनी जुगारात सर्वस्व गमावल्याने आत्महत्या केल्या आहेत. असंख्य कुटुंबांना देशोधडीला लागण्यापासून वाचवण्यासाठी या ऑनलाईन लॉटरी जुगारावर तातडीने बंदी घाला, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

संजय राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना पत्र दिले आहे. लॉटरी रेग्युलेशन अॅक्ट 2010 चे संपूर्ण उल्लंघन करून महाराष्ट्रात ऑनलाईन लॉटरी खुलेआम सुरू आहे व त्यास जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी जुगाराची उलाढाल वर्षाला 30 हजार कोटींपेक्षा जास्त आहे, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

लॉटरी जुगाराचे अडीच हजारांवर अड्डे
मुंबईसह महाराष्ट्राच्या कित्येक जिह्यांत या ऑनलाईन लॉटरी जुगाराचे 2500 पेक्षा जास्त अड्डे आहेत, या अड्डय़ांवर रोज हजारो लोकांची शेकडो कोटींची आर्थिक फसवणूक होत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

बेकायदेशीरपणे चालणाऱया ऑनलाईन लॉटरीवर कारवाईचे आदेश 2018 मध्ये पेंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले होते. या ऑनलाईन लॉटरी जुगाराच्या सीबीआय चौकशीची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती, पण तरीही हे जुगाराचे अड्डे सुरूच आहेत आणि त्यानंतर हप्त्यांचे आकडे मात्र वाढले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारला दरमहा 100 कोटींचा हप्ता
या ऑनलाईन जुगाराविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये यासाठी महिन्याला साधारण 100 कोटींचा हप्ता वित्त विभाग आणि गृह विभागापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवला जातो, असेही संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यात मध्यस्थी करण्याचे काम गुजरातमधील मंगलभाई नावाचा दलाल करतो, याकडेही संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.