लोकसभेत भाजप दोनशेवरच थांबेल!

भाजपच्या मनात पराभवाची भीती असून, त्यांचे किमान अडीचशे विद्यमान खासदार परत निवडून येणार नाहीत. त्यामुळे चारशे पारचा नारा हा ‘दोनशे पार’लाच थांबेल, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

नाशिक येथे बुधवारी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपाला टोले लगावले. परत निवडून येणार नाही या भीतीपोटी त्यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापले. एका-एका जागेसाठी ते रात्र-रात्र चर्चेत घालवत आहेत. नांदेडची आपली जागा टिकावी म्हणून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांचे किमान अडीचशे विद्यमान खासदार या क्षणी पराभवाला सामोरे जातील, असे चित्र आहे. त्यामुळे चारशे पारचा नारा दोनशे पारवरच थांबेल, असे ते म्हणाले. आमची लढाई गटा-तटांशी नाही तर भाजपाशी आहे. खरी शिवसेना सक्षम असून, नाशिकमध्ये आमचाच उमेदवार मोठय़ा मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रवींद्र वायकर हे मिंधे गटात म्हणजेच भाजपात का गेले, हे सगळ्यांना माहित आहे. तेव्हापासून त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणाऱयाचे तोंड बंद आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपाला सुनावले.

ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, या आमच्या भूमिकेशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा सोडले तर संपूर्ण देश सहमत आहे. कधीकाळी याच भारतीय जनता पक्षाने ईव्हीएम मुद्दय़ावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आमची भूमिका मात्र कायम आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक तरी जिंकून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले. मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेतून निघाल्याचे फोटो व्हायरल झाले, यावर संताप व्यक्त करीत शिवसेना आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी माणसावर रोज अन्याय होत आहे, मुंबई गिळली जात आहे, हा प्रश्न गंभीर असून, त्यासाठी शिवसेना लढत आहे. इतर गोष्टींपेक्षा मनसेने मुंबई गुजराती लॉबीमुळे संकटात आली आहे याची चिंता करावी, अशी टीका केली.

‘भारत जोडो’चे शिवसेनेकडून स्वागत
राहुल गांधी नाशिक या ऐतिहासिक भूमीत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमीत गुरुवारी येत आहेत. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आम्ही यजमान असून, शालीमार चौकात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक त्यांचे यथोचित स्वागत करतील. ते भारत जोडो यात्रेतही सहभागी होतील, असे खासदार संजय राऊत म्हणाले.