2024 नंतर मुख्यमंत्र्यांना काम काय उरणार! रस्ते धुण्यावरून संजय राऊतांनी केली धुलाई

मुख्यमंत्र्यांना 2024 नंतर रस्ते धुण्याचं काम उरणार आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 22 आणि 23 जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या आरती सोहळ्यापूर्वी पाहणी करण्यासाठी राऊत यांनी नाशिकचा दौरा केला. यावेळी त्यांनी येथील काळाराम मंदिर येथे प्रभु श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि मंदिराची पाहणी केली.

यानंतर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. 22 आणि 23 तारखेला होऊ घातलेल्या कार्यक्रमाची माहिती देताना राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यांनी काल स्वतः जाहीर केल्याप्रमाणे 22 आणि 23 तारखेला नाशिकच्या पुण्यभूमीत शिवसेनेचे राजकीय तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक असे दोन सोहळे होणार आहेत. 22 तारखेला अयोध्येमध्ये राममंदिराचं उद्घाटन होतंय, पंतप्रधान मोदी करताहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा आहेत. राम मंदिर होणं, उभं राहणं, ते लोकांसाठी खुलं होणं हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न होता. ते राम मंदिर व्हावं म्हणून शिवसेनेने केलेला त्याग आणि संघर्ष यांची नोंद इतिहासाच्या पानापानात केली जाईल. ज्या राम मंदिरासाठी हजारो शिवसैनिक करसेवक म्हणून गेले, तिथे करसेवा केली, त्या संघर्षात त्यांना अटका झाल्या, तुरुंगवास भोगला. असंख्य शिवसैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे आमचं भावनिक नातं कायम आहे. म्हणूनच आम्ही 22 तारखेला प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करणार आहोत. तो असा की सायंकाळी सहा वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेऊ, तिथे काही धार्मिक विधी होतील. तिथून आम्ही गोदातीरी जाऊन जशी आम्ही शरयू तीरावर प्रभू श्रीरामांची आरती करतो, तशी आरती केली जाईल, त्या आरतीला हजारो लोक येतील. त्यानंतर 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रसी क्लबमध्ये शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर होईल. आणि त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाईल. प्रचंड विराट सभा होईल आणि उद्धव ठाकरे त्या सभेला संबोधित करतील. असा हा कार्यक्रम असेल. 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये आम्ही प्रभू श्रीरामाचा गजर करणार आहोत.

मुख्यमंत्री सध्या राज्यातील रस्ते साफ करण्याच्या मागे लागले आहेत, याकडे कसं पाहता, या प्रश्नावर सणसणीत टीका करताना राऊत म्हणाले की, 2024नंतर त्यांना (मुख्यमंत्र्यांना) दुसरं काय काम असणार आहे? असा टोला राऊत यांनी हाणला.