निवडणुका आहेत तोपर्यंत लाडका भाऊ, लाडक्या बहिणीला पैसे, पुढे काही सांगता येत नाही; संजय राऊत यांचा महायुतीवर हल्लाबोल

राज्यातील महायुती सरकारच्या घोषणांच्या धडाक्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी योजना का नाही? असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. लाडका भाऊ, लाडक्या बहिणीला पैसे देताहेत. निवडणुका आहेत तोपर्यंत ते पैसे देतील. पुढे काही सांगता येत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

निवडणुकीच्या आधीचे जे अर्थसंकल्प असतात हे घोषणांचा पाऊस पाडणारे असतात. योजनांचा पाऊस पाडणारे असतात. पाच वर्षे काही करायचं नाही. कराच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पाच वर्षे लोकांना लुटाचं आणि निवडणुका आल्या की सवलती द्यायच्या. हे राष्ट्रीय स्तरावर अर्थसंकल्पात होतं आणि राज्य स्तरावरही होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा झाल्या. पण या राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर हजारो कोटींचं कर्ज आहे. त्यामुळे राज्यातला शेतकरी रोज आत्महत्या करतोय. विदर्भातल्या एकट्या अमरावतीत अडीच वर्षामध्ये दोन हजारांवर अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी, शेतकऱ्याचं कुटुंब, त्याला हमीभाव हवा आहे, दुधाला, कांद्याला, शेती उत्पादनं… त्याविषयी कोणत्याही योजना नाही? पण जसं लोकसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला, थेट मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. शिंदे गटाचे जे लोक जिंकलेले आहेत त्यातल्या बहुतेक ठिकाणी त्या-त्या मतदारसंघात किमान तीन ते चार लाख मतं विकत घेतली गेली. 2 हजार, 5 हजार 10 हजाराच्या रेटकार्डने मतं विकत घेतली गेली. कोकणात नारायण राणे यांच्याविरोधात विनायक राऊत हे पुराव्यासह कोर्टात गेले आहेत. रविंद्र वायकरांविरुद्धही तेच आहे. तुम्ही अशा प्रकारे पैसे वाटण्यापेक्षा रोजगार द्या. तरुणांना रोजगार हवा आहे, नोकऱ्या हव्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला संजय राऊत यांनी मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.

क आणि ड वर्गाच्या नोकऱ्या या कर्नाटकमध्ये भूमिपूत्रांना मिळणार आहेत. त्यात काय चुकलं? महाराष्ट्रात याच प्रश्नावर शिवसेना निर्माण झाली. भूमिपूत्रांना न्याय मिळाला पाहिजे. मराठी माणसांना न्याय मिळाला पाहिजे. मुंबईतील नोकऱ्यांमध्ये 80 टक्के वाटा हा मराठी तरुणांना मिळालाच पाहिजे. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एल्गार होता. आणि त्यातूनच शिवसेनेच्या स्थापनेची ठिणगी पडली. भूमिपूत्रांवरच्या अन्यायाची पहिली जी ठिणगी पडली ती महाराष्ट्रात बाळासाहेबांनी टाकली आणि मग देशात त्याचा वणवा पेटला. तेव्हा बाळासाहेबांवर लोकांनी प्रांतवादी, असा ठपका ठेवला होता. पण आज प्रत्येक राज्यात भूमिपूत्रांच्या न्याय हक्कासाठी कायदे केले जातात. त्याचं सर्व श्रेय हे शिवसेनेला आहे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातल्या नोकऱ्याच गुजरातला चालल्या आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यावर बोलताना दिसत नाहीत. लाडका भाऊ, लाडक्या बहिणीला पैसे देताहेत. निवडणुका आहेत तोपर्यंत ते पैसे देतील. पुढे काही सांगता येत नाही. ही निवडणुकीची तजवीज आहे. त्यांना स्वावलंबी करा, अशी आमची भूमिका आहे. नरेंद्र मोदी 80 कोटी लोकांना फुकट धान्य देत आहेत, ही काय गर्वाची बाब आहे का? लोकांना फुकटे करताय का? नोकऱ्या द्या, रोजगार द्या, स्वावलंबी बनवा, गुलाम कशाला बनवता? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मुळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे जनमत अजिबात नाही. एकनाथ शिंदे यांनी सहा सात जागा लोकसभेच्या जिंकल्या ते मतदान त्यांचं नाही. भाजपचं मतदान त्यांना पूर्णपणे झालेलं आहे. शिवसेनेचं मतदान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला झालं आहे. लाखो मतं आम्हाला पडली. धनुष्यबाणाचा गोंधळ झाल्यामुळे काही ठिकाणी आम्ही पराभूत झालो. हा गोंधळ निर्माण व्हावा म्हणूनच धनुष्यबाण हा बेईमान गटाला दिला गेला. लाखो मतं विकत घेतली. मतं विकत घेऊन निवडणूक जिंकण्याची पद्धत या राज्यात आणली. हा भ्रष्टाचार आहे. संघ परिवाराला हे मान्य असेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असे संजय राऊत म्हणाले.

भाजपला श्रेय घेण्याची जी घाई असते देशभरात त्यातलाच हा प्रकार आहे. देशातले अनेक प्रकल्प हे काँग्रेस राजवटीत सुरू झाले. तुम्ही काय उभं केलं आहे ते स्वतः सांगा. भाजपला श्रेय घेण्याचं व्यसन लागलं आहे. आणि कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात यावर उपचार होऊ शकत नाही, असा भीमटोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला. मुंबईत  24 जुलैपासून भूमिगत रेल्वे धावणार आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ही जोरदार टीका केली.