औरंगजेबाप्रमाणे भाजपची कबरही या महाराष्ट्रातच खणायचीय; संजय राऊत यांचा वज्राघात

पुण्यातील शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ धडाडली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या भाषणाने गणेश कला क्रिडाचे सभागृह दणाणून निघाले. घोषणा, टाळ्या आणि शिट्ट्यांनी सभागृह घुमले. संजय राऊत यांच्या दणदणीत आणि खणखणीत भाषणाने शिवसैनिकांमध्ये जोश भरला. ये हसता हुआ चेहरा कुछ लोगो के जलने का कारण है… महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे, ती उद्धवजींच्या हसण्यामुळे लागली आहे. संकटांवर संकटं येताहेत. संघर्ष होतोय, कोंडी केली जातेय. आमचा नेता हसत हसत संघर्षाचा सामना करतोय आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतोय. त्यामुळे ही जी जळफळाट सुरू आहे, ती उद्धवजी तुमचं हसणं आहे, अशी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाषणाला सुरुवात करताच सभागृहात शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत टाळ्यांचा कडकडाट केला.

‘आगामी विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतःकडे बघावं’   

सकाळपासून आजचं वातावरण पाहिलं तर खूप दिवसांनी पुण्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोणत्या जागा लढायच्या आहेत? काय करायचं आहे? याची यादी तयार आहे. पुणे, मावळ अन् पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढवण्याची ताकद शिवसेनेत आहे. गेल्या 25-30 वर्षांत या प्रत्येक जागेवर कधीना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे. तुम्ही एक-दोन जागा घेऊ नका. गेल्या काही वर्षांत शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या. आता शिवसैनिकांनी स्वतःच्या पालख्या वाहायच्या आहेत. कधी भाजपची पालखी वाहिली, त्यांचे आमदार निवडून आणले. कसब्याची निवडणूक झाली. शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्याचा आमदार निवडून आणला. सुप्रियाताई सुळे यांचा बारामतीत विजय करण्यासाठी शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं. पुण्यात लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं. पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे. आपण महाविकास आघाडीत जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे, हे आपल्याला करावं लागेल आणि यासाठी हा शिवसंकल्प मेळावा आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

‘एक तो तू रहेगा या मै रहूंगा लेकीन महाराष्ट्र मे रहेगी शिवसेना’

शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे, हे माननीय उद्धवसाहेब सांगतील. पण दोन दिवसांपूर्वी माननीय उद्धवजींनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना जो मंत्र दिलेला आहे, संदेश दिलेला आहे, तो घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. एक तर तू राहशील किंवा मी. एक तो तू रहेगा या मै रहूंगा लेकीन महाराष्ट्र मे रहेगी शिवसेना… तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भोकते है… हे सांगा त्यांना. हम शेर है खुलेआम ठोकते है. एक तो तू रहेगा नही तो मै रहूंगा हे सांगणारा या देशात महाराष्ट्रात जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय उद्धव ठाकरे आहेत, माझ्या नादाला लागू नका, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

‘विधानसभेची लढाई ही आरपारची लढाई’

ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक सोपी नाही उद्धवजी. तुम्ही आम्हाला नेहमी सांगता, ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगतो. नुसती हवा निर्माण करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीने लढलो आणि जिंकलो. तरी शिवसेने जे यश अपेक्षित केलेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही. आपण कष्ट केले. नवीन पक्ष, नवीन चिन्ह, समोर पैशाची ताकद, दहशतवाद या सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो. विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे. विधानसभेची लढाई ही आरपारची लढाई होणार आहे. आणि जे आपण म्हणालात एक तर तूर राहशील किंवा मी राहीन… राहणार आपणच, हे जरी खरं असलं तरी राहण्यासाठी प्रत्येकाला छातीला कोट करून यावेळी लढावं लागेल, असे आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केले.

‘विधानसभेला गाफिल राहू नका’

लोकसभेच्या काही जागांचा निकाल पाहिला तर अनेक ठिकाणी आपण महाराष्ट्रात आणि देशात गाफिल राहिलो. नाही तर मोदी तो गयो इथून. काल एक रिपोर्ट आलेला. भाजपचे लोक किंवा हे चोरांचे सरकार किती बारीक पद्धतीने काम करतात हे दिसतं. एडीआर ही एक संस्था आहे. या संस्थेचा एक रिपोर्ट आला आहे. त्यांचा रिपोर्ट अत्यंत ऑथेंटीक मानला जातो. निवडणुका झाल्यावर देशातल्या सर्व मतदारसंघांचा ते अभ्यास करतात आणि ते त्यांचा एक अहवाल देतात. देशातल्या एकूण 538 लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झालेली आहे. प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्या तफावत आहे, हे या संस्थेला आढळून आलं. 362 मतदारसंघात झालेले मतदानाचे जे आकडे आहेत त्या पेक्षा किमान साडेसहा लाख मतं कमी दिसताहेत. 176 मतदारसंघात 2 लाख मतं जास्त मोजली गेली आहेत. हा आकडा फार कमी दिसतोय. पण या महाराष्ट्रात 4 मतदारसंघ असे आहे जे आपण फार कमी मतांनी हरलेलो आहोत. 50 पासून ते 12 हजार ते 15 हजारापर्यंत मतांनी हरलो. मुंबईतील जागा 48 मतांनी हरलोय. हातकणंगलेची जागा आपण 12 हजार मतांनी हरलोय. बुलडाण्याची जागा आपण अत्यंत कमी मतांनी हरलोय. हे कमी मोजले आणि जास्त निघाले. त्यानंतर उत्तर प्रदेशातील ९ मतदारसंघात 100 ते 1000 मतांनी भाजपचा विजय झालेला आहे. बिहारमध्येही याच पद्धतीने झालेलं आहे. आणि या सगळ्यांच्या मतांचा आकडा मोजला तर तो सात लाख आहे. जिथे आपलं लक्ष नव्हतं, मतदान केंद्रावरील लोकांनी जरासा गाफिलपणा दाखवला आणि त्यामुळे अशा प्रकारे ते विजय चोरू शकले, आपल्याकडून सगळे हिसकावून घेतले. नाही तर भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेलाच होता. आणि अशा प्रकारचे देशातील 35 ते 40 मतदारसंघ असे होते जिथे पाच ते सहा लाख चोरलेली मतं आहेत, तिथे त्यांनी शेवटच्या क्षणी विजय मिळवलेला आहे. अशा प्रकारचे उद्योगधंदे हे विधानसभेत अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जे आपल्या नेत्यांचं आणि सहकाऱ्याचं मार्गदर्शन ऐकलंय. त्या मार्गदर्शनासोबतच जिथे आहात त्या जमिनीवर एखाद्या योद्ध्याप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. प्रत्येक मताची मोजणी होईपर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. तसं झालं नाही तर आज जे आकडे आलेले आहेत आणि त्यात किमान 35 ते 40 जागा आपल्या हातून निसटलेल्या आहेत, त्यात शिवसेनेच्या 4 चार जागा आहेत. त्या चार जागा आपल्या हातात आल्या असत्या तर आपण 14-15 जागा जिंकून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असतो. विधानसभेत अशा प्रकारचा गाफिलपणा आपल्याकडे असता कामा नये, असा सावधानतेचा संजय राऊत यांनी दिला.

शिवसेनेला निवडणुका नवीन नाही. आपण अनेक जय पाहिले, अनेक पराभव पचवलेत. त्यातून आपण उभे राहिलो. हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवर आणि पाठीवरही झेलले आहेत. माझ्या पाठीवर इतके वार झालेत, इतके घाव झाले आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या सगळ्या प्रसंगातून आपण इथपर्यंत आलोय. इथपर्यंत येत असताना उद्धवजींच्या नेतृत्वात जी लढाई जो संघर्ष करत आलोय, तो संघर्ष करणं सोपं नव्हतं. उद्धवजी काल जे म्हणाले तो त्यांचा त्रागा होता. माझ्या काळजात गेलेला तो शब्द आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आणि हीच आपली टॅग लाईन आहे निवडणुका जिंकाण्याची, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आपल्या नेत्याच्या तोंडातून निघालेला हा विजयाचा मंत्र आहे लढण्याची ताकद, ही तलवार आहे. उद्याच्या निवडणुकीत आपल्याला जिंकायचं असेल, महाराष्ट्र काबीज करायचा असेल तर एक तर तू राहशील किंवा मी राहीन, या जिद्दीने आपण मैदानात, या रणांगणात उतरायला पाहिजे. तू जाशील आणि मीच राहीन, ही जिद्द पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर हा महाराष्ट्र कोणावर प्रेम करत असेल श्रद्धा ठेवत असेल तर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आणि त्यांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या चोर लफंग्यांना अशी सहज चोरता येणार नाही, असा वज्राघात संजय राऊत यांनी केला.

‘औरंगजेबाप्रमाणे भाजपची कबरही या महाराष्ट्रातच खणायची’

पुण्याच्या या भूमित जे शिबिर आपण घेतोय, ती पवित्र भूमी आहे. या भूमिचं महत्त्व आहे, इथून सुरुवात होतेय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सोन्याचा नांगर या मातीत लावला आणि महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचं पिक काढलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत औरंगजेबाचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले, औरंगजेब गुजरातला जन्मला, हे मी वारंवार सांगतो. औरंगजेबची भाषा गुजराती होती, शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. औरंगजेबाचे व्यवहार उर्दू बरोबर गुजरातीतून चालत होतो. जी औरंगजेबाची वृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. तुम्ही औरंगजेबची अवलाद आहात, हे उद्धवजी का म्हणतात? कारण औरंगजेब हा दिल्लीतून महाराष्ट्रात आला, गुजरातला गेला अख्खा देश फिरत राहिला. राज्य काबीज करत राहिला, देवळं, मंदिरं तोडत होता. औरंगजेबाला पाचशे बायका होता. त्यात त्याच्या काही पट्टराण्या होत्या. औरंगजेबाला फावल्या वेळात टोप्या विणण्याचा छंद होता. मोदींनाही असे खूप छंद आहेत, धार्मिक… ते तपस्येला बसतात. औरंगजेबही ध्यान करत होता, जपमाळ ओढत होता. त्याचे फोटोही आहेत. विणलेल्या टोप्या तो अनाथ अश्रमात वाटत होता. औरंगजेबाच्या राणीने त्याला विचारलं जहापना, तुम्हाला नक्की काय करायचं काय मिळवायचं आहे? आता मी महाराष्ट्रावर स्वारी करणार, महाराष्ट्र काबीज केला की दक्षिणेकडे जाणार. अशा तऱ्हेने संपूर्ण राज्य, देश काबीज केला की या देशाच्या आजूबाजूचे इराण, अफगाणिस्तान वैगरे हे सुद्धा भाग ताब्यात घेणार आणि मग जागाचा राजा झाल्यावर शांतपणे जगायला सुरुवात करीन, असं औरंगजेबाने राणीला सांगितलं. तुम्ही आताचा निवांतपणे का जगत नाही? इतकं सगळं असताना. हा निवांतपणा तुम्हाला कधी मिळेल? असं राणी त्याला म्हणाली. औरंगजेबाच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खणली गेली आणि या भारतीय जनता पक्षाची कबर सुद्धा औरंगजेबाप्रमाणे या महाराष्ट्रातच खणण्याचं राष्ट्रकार्य इथे आपल्याला करावं लागणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

‘गायीचं मांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं दोन हजार कोटींचा निधी का घेतला?’

किती गिळायचंय भाजपला? तुम्ही अनेक राज्य जिंकली. देशात तुमची सत्ता आहे. तरी तुम्ही महाराष्ट्रात शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न केला, ते तुम्हाला पचनार नाही. तुम्ही शिवसेना गिळण्याचा जो प्रयत्न केला. पण शिवसेना हा आगीचा लोळ आहे तो तुम्ही गिळलात, तो तुम्हाला पचनार नाही. आपल्याला मराठी माणसाला या वेळेला शिवसैनिकांना जागं करावं लागेल. ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची आहे. भारतीय जनता पक्ष किती गोंधळलेला आहे. हिंदूंच्या एकगठ्ठा मतांसाठी भारतीय जनता पक्ष विधानसभेत रणनीती आखणार आहेत. याचा अर्थ लोकसभेत त्यांना हिंदूंची मतं मिळालेली नाहीत. स्वतःला हिंदूंचा पक्ष आणि हिंदूंचे नेते म्हणवणाऱ्यांना हिंदूंची मतं मिळाली नाहीत. आम्हाला मुस्लिमांची मतं मिळाली, असे म्हणता. होय आम्हाला मुस्लिमांची मतं मिळाली. या देशातल्या सर्व अधिकृत नागरिकांची मतं आम्हाला मिळाली, त्यात हिंदू आणि मुस्लिमही आहेत. जैन, पारशी आहेत. पुण्यात सकाळी फिरताना एक उंच धिप्पाड व्यक्ती भेटली. मी शिवसेनेला मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. या देशातल्या सर्व जाती, धर्माच्या लोकांनी महाराष्ट्रात उद्धवजींना मतदान केलेलं आहे. बहुसंख्य हिंदूंनी, मुस्लिमांनी, ख्रिश्चनांनी आम्हाला मतदान केलं आहे. सर्व जाती, धर्माच्या लोकांनी मतदान केलेलं आहे, कारण या राज्यात आश्वासक चेहरा कोणता असेल तर तो माननीय उद्धवसाहेबांचा आहे. हा विचार आणि ही भूमिकाही आपल्याला महाराष्ट्रात घराघरात न्यावी लागेल. हिंदूंच्या एकगठ्ठा मतांसाठी ते आता कामाला लागलेत. मग 30-35 वर्षे काय झक मारत होतात. याचा अर्थ असा आहे, तुमच्यासोबत ही शिवसेना होती म्हणून तुम्हाला ही मतं मिळत होती. आता आम्ही तुमच्या बरोबर नाही, तुम्हाला हिंदू मतांसाठी धडपड करावी लागेल. पण जेव्हा हे हिंदू म्हणून मतं मागायला येतील, तेव्हा प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही हिंदूंसाठी काय केलं? परवा पाच ऑगस्ट आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याला पाच वर्षे होत आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली हे कलम काढण्यात आलं. पाच वर्षांत हिंदू काश्मिरी पंडितांसाठी या सरकारने काय केलं? काश्मिरी पंडित आपल्या घरी जाऊ शकले का? घरवापसी झाली का? आजही काश्मीरची परिस्थिती जशी आहे तशीच आहे. फक्त त्या प्रश्नाचं राजकारण केलं. भाजप, संघवाल्यांना विचारा… गायीचे भक्त आहात… गोमाता म्हणतात. मग गायी कापणाऱ्या… गायीचं मांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं दोन हजार कोटींचा निधी का घेतला? त्यांना हिंदुत्ववादी म्हणण्याचा अधिकार नाही. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज आले होते. त्यांनी उत्तम विषय मांडला. केदारनाथच्या मंदिरातलं 500 किलो सोनं या भाजपच्या लोकांनी गायब केलं आहे. केदारनाथच्या गुहेत नरेंद्र मोदी तपस्या करायला जातात. केदारनाथच्या मंदिरातलं 500 किलो सोनं कोणी चोरलं? हा प्रश्न हिंदू म्हणून आपण विचारायला हवा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. अयोध्येच्या रामाचे आपण मालक झाला होता. आज रामाला गळक्या छपराखाली कोणी बसवलं आहे? नव्या मंदिरात गळक्या छपराखाली  राम बसला आहे. यामुळे त्या गळक्या छपराखाली असलेल्या रामाला पुन्हा एकदा सुरक्षित जागेत नेण्यासाठी आंदोलन करावं लागेल. हिंदूंचा देव, हिंदूच्या राजाला त्याच्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं गळक्या छपराखाली बसवलं आहे, छत्री लावली आहे. आपण हिंदू म्हणून जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा फक्त मतांसाठी हिंदुत्व नाही. माननीय बाळासाहेबांनी सांगितलंय… पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, नोकरीचा, रोजगाराचा, शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात विदर्भात होत आहेत. हे सर्व प्रश्न घेऊन आपल्याला पुढील दोन महिने फिरावं लागेल, गावागावात जावं लागेल. तू राहशील किंवा मी राहीन, हा मंत्र आपल्या पक्षात नको. आम्ही सगळे राहू. तिकीट तुला मिळेल की मला मिळेल? नाही तर तुला बघून घेईन, हे नको. उद्धवजी देतील तो उमेदवार आहे. आधी सत्ता येऊ द्या सर्वांना सर्वकाही मिळेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही’

शिवसेना ही सर्वांसाठी आहे. शिवसेना ही सूर्याच्या किरणांसारखी आहे. सूर्याची किरणं जशी उगवल्यावर सर्वांसाठी असतात खिडकीतून, फटीतून ती दारातूनही जातात, असा शिवसेनेचा विचार आहे. शिवसैनिकांनी आत्मसात केला पाहिजे. मी तृप्त आहे. मला या पक्षाने इतकं दिलेलं आहे या पक्षात मला मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही. या पक्षासाठी जगेन आणि मरेन. प्रत्येकाला पक्षाने प्रतिष्ठा आणि जगण्याची जिद्द दिलेली आहे. पुढच्या दोन महिन्यांत आपसातल्या मनातील जळमटं पहिली दूर केली पाहिजेत. आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखीली पुन्हा उभा राहिलेला ज्वलंत असा पक्ष, ती मशाल आपण पेटत ठेवली पाहिजे. आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण आपल्याला फेडायचे असतील, महाराष्ट्रावरचे, मराठी माणसावरचे तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये गद्दारांना गाडून… गद्दार मेलेलेच आहेत. लोकसभा निडणुकीत गद्दारांचं पार स्मशान झालेलं आहे. आता आपली लढाई आहे सत्तेवर येण्याची, महाराष्ट्र काबीज करण्याची, जिंकण्याची. या लढणाऱ्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणी करत असेल तर ती फक्त शिवसेना आहे. महाराष्ट्रात माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर एवढा विश्वास आहे, जर आपण 288 उमेदवार उभे केले तर आपण किमान 160 जागा जिंकून आणू, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात आहे. पण शेवटी आपण शब्दाला पक्के आहोत. महाविका आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वात पुढे जाईल. आणि महाविकास आघाडीचं सर्वोच्च नेतृत्व आपल्याच पक्षाकडे राहील, यासाठी सर्वाधिक आमदार निवडून आणणं हे माझ्यासह सर्व शिवसैनिकांचं कर्तव्य आहे, असे आवाहन यावेळी संजय राऊत यांनी केलं.