जागावाटपापेक्षा भाजपचा पराभव हीच प्राथमिकता – संजय राऊत

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून जागावाटपापेक्षा भाजपचा पराभव हीच आमची प्राथमिकता आहे. कारण देशातलं संविधानविरोधी वातावरण आम्हाला संपवायचं आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीकाही केली.

यावेळी राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर हे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले. सविस्तर चर्चा झाली, पुढली दिशा ठरली. अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की, आपण एकत्र राहून काम करायचं आहे, निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि देशात संविधानविरोधी जे वातावरण निर्माण केलंय, ते आपल्याला संपवायचं आहे आणि भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होईल, अशी पावलं कुणीही उचलणार नाही, याविषयी आमचं एकमत झालेलं आहे. अर्थात महाराष्ट्राचं राजकारण हे ज्या पद्धतीने सध्या गटांगळ्या खातंय आणि देशातलं जे वातावरण आहे, हुकूमशाही, एकाधिकारशाही, फसवणूक. ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे. अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्या अनेक विषयांवर ज्या भूमिका आहेत, त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच आम्ही पुन्हा भेटणार आहोत, असं राऊत यावेळी म्हणाले.

‘आमच्यासाठी जागावाटप हा प्रश्न नाही. भाजपचा पराभव ही आमची प्राथमिकता आहे, त्यानंतर जागावाटप आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी आमच्यात फार मतभेद नाहीत. जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीने वेगळ्या गटाची आम्ही नियुक्ती करत आहोत. हा गट जाहीरनामा तयार करेल, महाराष्ट्राच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचे विषय त्यात घेतले जातील. त्या संदर्भात सामाजिक, शेतकरी, कष्टकरी या विषयांवर प्रकाश आंबेडकर यांच्या काही सूचना आहेत, त्यांचा समावेश या कार्यक्रमात केला जाईल’ अशी माहिती राऊत यांनी दिली.

‘इंडिया आघाडी या देशात काम करत आहे. आघाडीचे काही निर्णय या धोरणात्मक हालचाली आहेत. बंगाल, पंजाब, आप, तृणमूल असेल.. आप आणि काँग्रेसची दिल्लीत युती होत आहे. पंजाबमध्येही आम्ही ठरवू काय करायचं. काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भाजपचा पराभव करण्यास समर्थ आहेत. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतच आहेत. जागा वाटपाबाबत काही विषय झाले असतील. पण, त्या इंडिया आघाडीच्या घटक आहेत. त्यामुळे पुढची बैठक त्या बोलवणार असल्याची शक्यता आहे, असंही राऊत म्हणाले.