शेतकरी सरकारला ‘लाडका’ वाटत नाही, सगळा निधी एकाच योजनेकडे वळवला! संजय राऊत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

सरकारकडे इतर वायफळ कामांसाठी पैसे आहेत. पण शेतकरी जेव्हा मरणपंथाला लागतो तेव्हा शेतकरीही आपला ‘लाडका’ आहे असे सरकारला वाटत नाही. पाच-पंचवीस खोके शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी, भल्यासाठी द्यावेत ही सरकारची मानसिकताच नाही, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. बुधवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी मराठवाडा दौऱ्याचीही माहिती दिली.
मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे दौऱ्यावर जात असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह आम्हीही त्यांच्यासोबत असणार आहोत. मराठवाड्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, घरापर्यंत पोहोचून त्यांचे दु:ख, अडचणी, नुकसानीची माहिती घेऊ. संभाजीनगरला उतरून हा दौरा सुरू करू आणि पुढे नांदेडपर्यंत जाऊ, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर जाग आलेल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू ठेवण्याचे आदेश दिले. याचाही समाचार घेताना राऊत म्हणाले की, सध्या त्यांच्या पक्षावर मोठी आपत्ती कोसळली आहे. मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात दुर्दैवाने जो प्रकार घडला त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळलेली आहे त्यातून सावरायला त्यांना वेळ नाही. तिथेच त्यांचे आपत्ती व्यवस्थापन फेल झाले. आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करताच मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला जाग आली, आणि मग पंचनाम, नुकसान भरपाई सुरू केली. पण हे ढोंग आहे, हे शेतकऱ्यांना माहिती आहे. हे वारंवार त्यांच्या बाबतीच गेल्या अडीच वर्षात घडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत जाग येते. खरे म्हणजे या राज्याच्या सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्याने शेतकऱ्यांवर आफत आली आहे, असेही राऊत म्हणाले.
शिवपुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे अद्याप फरार आहे. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. याचा अर्थ तो पोलिसांच्या हाती लागत नाही. राज्यातील गृहखाते, सरकार काय करतंय? असा सवाल राऊत यांनी केला. महाराष्ट्रातून हे महाशय पळून गेले असतील तर सरकारनेच त्यांना मदत केलेली आहे. पळून गेला नसेल तर त्याला लपण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गुंडांचे, गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेला मंत्रालयाचा सहावा मजला आणि वर्षा बंगला ही अत्यंत सुरक्षित जागा आहे. वर्षाशिवाय गुन्हेगारांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? नसेल तर अटक करा. आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, खोटे गुन्हे दाखल करता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला त्यात तत्परता का नाही? या पुतळ्याच्या निर्मिसाठी मंजूर झालेले कोट्यवधींचे बजेट कुठे गेले? हा पुतळआ 10-15 लाखात बनल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. पण पुतळ्यासाठी 15-16 कोटी मंजूर झाले होते, अशी माहितीही राऊत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, बदलापूर घटनेवर मुख्यमंत्री, गृहमंत्री बोलत नाहीत. बदलापूरमधील ज्या शाळेत ही घटना घडली त्या संस्थेचे प्रमुखही आपटे आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल केली असून अद्याप अटक झालेली नाही. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज कुणी गायब केले? संस्थेच्या प्रमुखांनीच केले असेल ना. फक्त एका शिपायाला वाचवण्यासाठी की त्यामागे आणखी काही रहस्य आहे? सरकार काय करतंय? अशा सवालांच्या फैरीही राऊत यांनी सरकारवर डागल्या.