मोदी सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन देश चालवतात, हाच त्यांचा ‘विकास’, संजय राऊत यांचा टोला

अजित पवारांवर आरोप असलेल्या 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट ईओडब्ल्यूने सादर केला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘हाच विकास आहे’, असे म्हणत निशाणा साधला.

अजित पवारांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केला असे मोदी म्हणत होते. अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा हा डिफेन्समधील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मोदी म्हणाले होते. मोदी भ्रष्टाचाऱ्यांबद्दल बरंच काही बोलतात. पण हेच मोदी भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन देश चालवतात आणि हाच त्यांचा विकास आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत प्रश्न विचारायला हवा. 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर आणि 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यावर गृहमंत्री या नात्याने त्यानी उत्तर द्यायला हवे. त्यांची जीभ अडखळत असेल तर हा प्रश्न जेपी नड्डा यांना विचारायला पाहिजे. त्यांना या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर हाच प्रश्न देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विचारायला हवा. शहा सुद्धा उत्तर देऊ शकले नाही तर याचे उत्तर पंतप्रधान मोदींना विचारायला हवा. मोदींनीच भ्रष्टाचार सहन करणार नाही, भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, भ्रष्टाचार संपवी हीच मोदींची गॅरंटी अशी वल्गना केली होती. त्यांनाच याबाबत विचारायला हवे, असा टोला राऊत यांनी लगावला.

अजित पवार, हिमंत बिस्वा शर्मा, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, भावना गवळी, हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केलो होते. मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात युद्ध पुकारले होते. फडणवीस नवाब मलिकांच्या बाजुला अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार होते. आज हे दोन्ही लोकं भाजपच्या बाजुला बसले आहेत. याच लोकांना पक्षात घेऊन वाशिंग मशीनमध्ये टाकून मंत्री बनवले गेले आहे. याचाच अर्थ हे राज्यातील, देशातील लोकांशी खोटं बोलले, अशी टीका राऊत यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनामध्ये शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री एकमेकांशी भिडले. हे गँगवॉर आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड पाहिले त्यांना माहिती आहे की त्यांच्यातही असे गँगवॉर व्हायचे. शिंदे गँगमध्येही हेच गँगवॉर सुरू आहे. एक मंत्री आणि आमदार विधानसभेत धक्काबुक्की करतात, शिवीगाळ करतात आणि फडणवीस म्हणतात सर्वकाही ठीक आहे. हाच विकास आहे, तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल, असेही राऊत म्हणाले.

मतं ठाकरे-पवारांसोबत

शिंदे गट आणि अजित पवार गट कमळावर लढतील अशी माहिती असल्याचेही राऊत म्हणाले. शिंदे गटाचे खासदार चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत. अजित पवारांचे लोकंही कमळाबाईबरोबर जाऊ इच्छितात. त्यांना स्वत:च्या मतांची खात्री नाही. हे मतं आणणार तरी कुठून? कारण चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत. मतं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबरोबरच आहेत, असेही राऊत म्हणाले.

आंबेडकर लोकशाही आणि संविधानाचे चौकीदार

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होतील. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून ते लोकशाही आणि संविधानाचे चौकीदार आहेत. देशाच्या दुर्दैवाने पुन्हा मोदी-शहांचे राज्य आले तर सामान्य माणसाच्या घरावरही धाडी पडतील. कष्टकरी माणसालाही ईडीवाले पकडून घेऊन जातील या प्रकाश आंबेडकरांच्या मताशी सहमत असल्याचेही राऊत म्हणाले.