पंतप्रधान तर महाराष्ट्रात डेरा टाकून, पक्षासाठी गल्लीबोळ फिरताहेत; मोदींच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांचा भीमटोला

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची पुढच्या काही दिवसांत घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्राचे दौरे वाढले आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान महाराष्ट्रात डेरा टाकून बसलेले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्या मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. तेथील शिवसैनिकांचे मनोगत जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान तर महाराष्ट्रात डेरा टाकून बसलेले आहेत. आज विदर्भात आहेत, मग ठाण्यात जाणार आहेत. भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान गल्लीबोळ फिरताहेत, भीमटोला संजय राऊत यांनी लगावला.

राहुल गांधीही महाराष्ट्रात आलेले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनेच सर्वांची तयारी सुरू आहे. शिवसेना सुद्धा शिवसेनेचे नेते असतील पक्षप्रमुख असतील आदित्य ठाकरेजी असतील हे राज्यात दौरे करताहेत फिरताहेत, शिवसैनिकांचं मनोगत समजून घेताहेत. उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. यावेळी सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं असेल. कालपासून मी धुळ्यात आहेत. धुळ्यातही लोकांना बदल हवा आहे. हा बदल धुळे शहरातही हवा आहे. त्या दृष्टीने चाचपणी आणि पाहणी सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.