2024च्या निवडणुकीनंतर मोदींचं स्मरणही कोणाला राहणार नाही! – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना पंडित नेहरूंसंदर्भात केलेली वक्तव्यं हे मी नेहरूंचे यश मानतो. कारण नेहरूंच्या मृत्युला 60 वर्ष झाली, पण मोदी गेल्या 10 वर्षांपासून त्यांचा जप करत आहेत. मात्र 2024च्या निवडणुकीनंतर पंतप्रधानवरून दूर झाल्यावर मोदींचे स्मरणही कोणाला राहणार नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या एका नेत्याने संसदेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने वारंवार कसा पराभव केला हे सांगितले. शेवटी त्यांनी भंडारा मतदारसंघात काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केल्याचा उल्लेख केला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे उमेदवार नव्हते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती ते काँग्रेसचे नेते मनोहरभाई पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल आज भाजपमध्ये आहेत. त्यांना भाजपने ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आपल्या पक्षात घेतले असून हा ढोंगीपणा आहे. भाजपच्या धमन्यातून हा ढोंगीपणा कधी बाहेर पडेल सांगता येत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

भाजपला आजही काँग्रेस, इंडिया आघाडीची भीती

भारतीय जनता पक्षाला आजही काँग्रेस, इंडिया आघाडीची भीती वाटते. आम्हाला स्वत:च्या हिंमतीवर, ताकदीवर 400 जागा मिळणार, अबकी बार 400 पार म्हणता मग गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसवर टीका का करताय? 50-60 वर्षांपूर्वीचा इतिहास तोडून-मोडून लोकांसमोर का मांडताय? असा सवाल करत भाजपने आपल्या कामांविषयी, विकास कार्याविषयी बोलावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

रामाला विसरून काँग्रेसचे भजन सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख नव्हता. कश्मिरी पंडितांविषयीही एक शब्द बोलले नाहीत. लडाखमध्ये पेंगॉन लेकपर्यंत चीन घुसलाय, त्यावरही बोलले नाहीत. पण ते पंडित नेहरू आणि काँग्रेसचे भजन करत बसले आहेत. आता हे रामालाही विसरून काँग्रेसच्या भजनाला लागल्याचा टोला राऊत यांनी लगावला.

‘चाय पे चर्चा’ऐवजी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चर्चा करावी

देवेंद्र फडणवीस सध्या विदर्भात चाय पे चर्चा करत फिरताहेत. त्याऐवजी त्यांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चर्चा करावी. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज त्यांच्या पक्षात गुंडाला प्रवेश देत आहेत. त्यासंदर्भातील फोटो मी रोज समोर आणत आहे. आजही एक फोटो टाकला असून त्यात हत्या, दरोडेखोरी, लुटमार, अपहरण यातून जामिनावर सुटलेल्या आरोपीला पक्षात प्रवेश दिल्याचे दिसतेय. आतापर्यंत 350 गुंडांना प्रवेश दिला असून तेवढेच गुंड वेटिंगला आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.