नरेंद्र मोदी लोकशाही टीकू देतील का याकडे साऱ्या जगाचे लक्ष, संजय राऊत यांचा पंतप्रधानांच्या पत्रावरून टोला

Pc - Abhilash Pawar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी देशातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष हिंदुस्थानकडे असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला उत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांना जोरदार टोला लगावला. ”पंतप्रधान म्हणतात साऱ्या जगाचे लक्ष हिंदुस्थानकडे आहे. मात्र हे लक्ष देशातील लोकशाहीकडे आहे. सारं जगं हे या देशात लोकशाही टिकेल का? मोदीजी लोकशाही टीकू देतील का? मोदीजी मतमोजणी व्यवस्थित होऊ देतील का? याकडे लक्ष देऊन आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर देखील सडकून टीका केली. ”निवडणूक आयोगाबाबत लोकांच्या मनात खूप शंका आहेत. निवडणूक आयोग एक सांविधानिक स्वतंत्र संस्था आहे. पण तरिही आम्हाला विरोधकांना सतत त्यांच्यासमोर जाऊन हात जोडावे लागतात, त्यांना चुकीच्या गोष्टी दाखवून द्याव्या लागतात. त्याकडे ते दुर्लक्ष करतात. हे एका स्वतंत्र संस्थेचे लक्षण नाही. मोदीजी मतदानाच्या दिवशी ध्यानाला बसतात. सर्व चॅनेलचे फोकस त्यांच्यावर येते हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सूचना देतात ते देखील आचारसंहितेचे उल्लंघन आहे. पोलिंग एजंटला जसे रोखले गेले ते देखील ठीक नाही. एक्झिट पोल ज्याप्रकारे येतायत. त्यावरून लोकांवर मानसिक दबाव टाकला जातोय. आम्हाला सतत निवडणूक आयोगाला सांगावं लागतंय की तुम्ही स्वतंत्र संस्था आहे. तुम्ही भाजपचे गुलाम नाही. ते भाजपची एक शाखा असल्यासारखे काम करत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात देशाची लोकशाही धोक्यात आली आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

नाशिक शिक्षक मतदारसंघ शिवसेना लढवेल

”स्थानिक स्वराज्य संघाच्या, शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका आहेत. शिक्षक व पदवीधर मतदारसंघ शिवसेना निवडणूक लढवेल. मुंबईसाठी अनिल परब आज अर्ज भरतील. नाशिक शिक्षक मतदारसंघ देखील शिवसेना निवडणूक लढवेल व तेथून संदीप गुळवे आमचे उमेदवार असतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. संदीप गुळवे मराठा शिक्षण प्रसारक संघाचे संचालक आहेत. त्याचं राजकीय शिक्षण क्षेत्रात त्याचं मोठं योगदान आहे. ते निवडणूक जिंकतीलच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शिवसेनेवर ऐरागैऱ्याने बोलू नये

रवी राणा यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत यांनी कोणत्याही ऐरागैऱ्याने शिवसेनेबाबत बोलू नये, असे संजय राऊत यांनी सुनावले. ”कोण रवी राणा. काय सकाळ सकाळ नावं घेताय़ कुणाचंही. त्यांचा राजकारणाशी कधी संबंध आला. शिवसेना हा महाराष्ट्रातला सर्वात जुना पक्ष आहे. उद्धव ठाकरे गेली 25 वर्ष पक्ष चालवत आहेत. अशा पक्षाच्या भूमिकेवर कोणा ऐरागैऱ्याने बोलावं हे बरोबर नाही. तुम्ही तुमच्ं बघा. आमच्या नादाला लागू नका, असे संजय राऊत यांनी रवी राणा यांना सुनावले.