गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरुय, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे होणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातला पळवण्यात आला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. गुजरातसाठी केंद्र सरकारची दरोडेखोरी, वाटमारी सुरू असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. ते पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.

सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प, पुण्यातील टेस्ला कंपनीचा प्रकल्पही गुजरातला चालला आहे. महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला चालले आहेत? अशा सवाल पत्रकारांनी विचारला असता राऊत म्हणाले की, तीन-तीन काय आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला गेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. हे परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत.

टेस्ला गेला, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पही गेला, आपल्या येथील हिरे व्यापारही सूरतला गेला, त्याआधी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पही गेला. हे सरकार आल्यापासून 17 मोठे प्रकल्प गुजरातला जबरदस्तीने खेचून घेऊन गेले. याला दरोडेखोरी, वाटमारी म्हणतात. गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरू असून वाटमारी करणाऱ्यांवर दहशतवादविरोधी गुन्ह्यांतर्गत गुन्हे दाखल व्हायला हवेत. ही दहशतच असून दहशतीने मुंबईतून उद्योगपतींनी घेऊन जात आहेत आणि त्यावर हिंदुत्ववादी, मोदीभक्त सरकार बोलायलाही तयार नाही. महाराष्ट्राची, मुंबईची वाट लावण्याचे धोरण असणाऱ्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

कालच्या भाषणाचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, मी काल भाषणात म्हणालो की गुजरातला सोन्याने मढवा. सगळं सोनं घेऊन गुजरातला सोन्याने मढवा आणि द्वारका करा. पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास का खेचून घेताय? आतापर्यंत मुंबई, पुणे, महाराष्ट्राने उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचे पोट भरलेले आहे. पण त्यांना हे पहावत नाही. आधी गुजरातचा विकास, मग देशाचा विकास असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती. या देशात अनेक राज्यांचे पंतप्रधान होऊन गेले. पण ही भाषा कोणी वापरली नव्हती. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत. आमचे सरकार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही दुर्बळ, अपंग, लाचार झालेले आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणेही यावर गप्प असल्याचे पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी किंवा जे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर चालले त्यावर कॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलण्याची त्यांची ताकद नाही. ते कायम म्हणतात मी शिवसेनेत होतो, मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही असे बोलावे. तसेच शिवसेनेचे नाव चोरणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांचे नाव सांगणाऱ्या अजित पवारांनीही तो बाणा दाखवावा, असे आव्हान राऊत यांनी दिले.

संपूर्ण देशात अमली पदार्थाचे रॅकेट सुरू आहे. त्याचे केंद्रस्थान गुजरातमध्ये आहे. गेल्या काही वर्षांत मोदींचे सरकार आल्यापासून साडे तीन लाख कोटींचे अमली पदार्थ गुजरातच्या मुंद्रा बंदरातच पकडले गेले आहे. यातील सर्वाधिक अमली पदार्थ महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग चालले आहेत आणि गुजरातमधून महाराष्ट्रात अमली पदार्थ येत आहेत. महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सरकारच रेव्ह पार्टीतून निर्माण झाले आहे. पैशांनी निर्माण केलेले हे सरकार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे, हे सरकारला दिसत नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.

दीड वर्षात फक्त आमदार-खासदारांचा भाव वाढवला

सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही. शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या किंकाळ्या दिसत नाही. बेरोजगारी, महागाईसह अनेक प्रश्न आहेत. जुन्या वर्षातून नव्या वर्षात काय घेऊ चाललो आहोत? तर हीच ओझी घेऊन चाललो आहोत. दीड वर्षात काय केले? तर फक्त आमदार-खासदाराचा भाव वाढवला, असा टोला राऊत यांनी लगावला. शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही लिलाव पद्धतीने भाव लावलेला आहे. नगरसेवकाचा, जिल्हा परिषद सदस्यांचा भाव लावलेला आहे. मग शेतकऱ्याच्या मालाला भाव कधी देणार? असा रोखठोक सवाल राऊत यांनी केला. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पण त्यांच्या मालाला आहे तेवढा तरी भाव मिळतोय का? असा सवालही राऊत यांनी केला.

राम मंदिराचे उद्घाटन राजकीय सोहळा केलाय

राम मंदिराचा सोहळा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे. आम्ही स्वत: त्यामध्ये आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत. पण हा सोहळा भाजपाचा झालेला आहे. तो देशाचा सोहळा व्हायला पाहिजे. पण यांनी तो राजकीय सोहळा केला आहे. त्यांचा राजकीय सोहळा होऊ जाऊ द्या, मग आम्ही पाहू. आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला, ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले त्याला गालबोट लावायचे नाही. योग्य वेळी बोलू, असेही राऊत म्हणाले.

राममंदिरासाठी शिवसेनेने मोठा लढा दिला; भाजपने उगाच फुशारक्या मारू नयेत! उद्धव ठाकरे यांनी अयोध्येवरून ठणकावले