बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी व्यक्ती कोण शोधल्यास गुंडशाही कोण पोसतं ते कळेस, संजय राऊत यांचा घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने त्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या भेटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटाला फटकारले आहे.

संजय राऊत यांनी गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत एक ट्विट केले असून श्रीकांत शिंदे यांना भेटायला आलेली व्यक्ती कोण आहे ते शोधल्यास राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल असे आवाहन केले आहे. ”माननीय गृहमंत्री देवेन्द्रजी, जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.