राजीनामा कसला देता, लोकांनीच तुम्हाला घरी पाठवले; संजय राऊत यांचा फडणवीसांना सणसणीत टोला

महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दर्शवणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार टीका केली. मिस्टर फडणवीस! तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलीत, राजीनामा कसला देता, लोकांनीच तुम्हाला घरी पाठवले, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांचे नाव काळय़ाकुट्ट अक्षरात लिहिले जाईल, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात सुडाचे आणि बदल्याचे राजकारण कधीच नव्हते, ते फडणवीस यांनी सुरू केले. सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्रातील एक पिढी संपवण्याचे काम फडणवीसांनी केले. राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी सत्ता वापरली. त्यांनी न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तीना घरी बोलावून धमकी दिली, ते काम फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केले, असा आरोपही राऊत यांनी केला. जे दोन पक्ष त्यांनी पह्डले त्या पक्षांनीच त्यांच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

संघ मोदींना पर्याय शोधतोय, पराभूत माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही संजय राऊत यांनी या वेळी टीका केली. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सोपा नाही, संघ मोदींना पर्याय शोधतोय, त्यांना भाजपमधूनच विरोध असल्याची माझी माहिती आहे, असे ते म्हणाले. 2014 आणि 2019मध्ये 56 इंचाची नसलेली छाती घेऊन मोदी रुबाबात पुढे जात होते, आता त्यांचा चेहरा बघा, त्यांची भाषा बघा. मोदींचा पराभव झाला आहे आणि असा पराभूत झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला.

विधानसभेला यापेक्षा मोठे यश मिळेल
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघानुसार 125 जागांवर आघाडी मिळाली आहे. विधानसभेला यापेक्षा जास्त मोठे यश मिळेल. 180 ते 185 जागा जिंकू, असा विश्वासही संजय राऊत यांनी या वेळी व्यक्त केला.

फडणवीस महाराष्ट्रातील पुरुष आनंदीबाई
पेशवे काळात आनंदीबाई होत्या, त्यांची आठवण ज्यासाठी काढली जाते, तसे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई आहेत, अशी खिल्लीही संजय राऊत यांनी उडवली.