फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत; संजय राऊत यांची टिका

देवेंद्र फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत शिरले आहेत. ते मायावी रुपं घेऊन महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये शिवसेनेचे महाशिबिर आणि अधिवेशन होत असून या शूर्पणखेचे नाक आम्हाला 2024 ला कापायचं आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

गुरुवारी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याचाही खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. बाळासाहेब वाघ तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात, अशा शब्दात राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला. आम्ही वाघच आहोत. ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’ अशी गर्जना महाराष्ट्र उगच करत नाही. तुम्ही कधी कोण आला रे कोण आला… भाजपचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला अशी घोषणा देताना पाहिले का? शिवेसनेचा वाघ आला ही संकल्पना असून बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखे जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली, असेही राऊत म्हणाले.

बाबरी पाडली किंवा त्या संपूर्ण घडामोडीत शिवसेना कुठे होती हे पहायचं असेल तर बाबरी पाडल्यानंतर स्थापन झालेल्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रातील आरोपींची नावे फडणवीस यांनी पहावी आणि त्यात किती शिवसैनिक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावे. फडणवीस आणि त्यांचे चेलचपाटे एकनंबरचे खोटारडे आहेत. रामाचे श्रेय तुम्ही जरूर घ्या, पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊ देईल का हे 2024 ला कळेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

अयोध्येच्या आंदोलनात हजारो शिवसैनिक सहभागी होते. दै. सामनावर 150 खटले दाखल झाले. त्यावेळी मी स्वत: तीन वेळा लखनौतील इंदिरानगर येथील सीबीआय कोर्टाट हजर राहिलो. बाळासाहेबही लखनौच्या कोर्टात गेले. सतिश प्रधान, मनोहर जोशी, विद्याधर गोखले आणि त्यावेळी शिवसेनेत असलेले मोरेश्वर सावे, आमदार, नगरसेवकही असे शिवसेनेचे असंख्य वाघ होते. म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभे रहात आहेत. पण देवेंद्र फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत शिरले आहेत. ते मायावी रुपं घेऊन महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये शिवसेनेचे महाशिबिर आणि अधिवेशन होत असून या शूर्पणखेचे नाक आम्हाला 2024 ला कापायचं आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.

दरम्यान, ट्रान्सहार्बर लिंकच्या लोकार्पणासाठी पंतप्रधानांना वेळ मिळाला कारण आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील. प्रकल्प काही पूर्ण होतात, तर काही अपूर्ण असले तरी लोकार्पण होते. अयोध्येतील राम मंदिरही अपूर्ण आहे. पण निवडणुका समोर ठेऊन त्याचे लोकार्पण होत आहे. मंदिर अपूर्ण असल्याने देशातील चार प्रमुख शंकराचार्यांनी या सोहळ्याला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे स्वत:ला हिंदुत्ववादी समजणाऱ्या नेत्यांनी याचा विचार करायला हवा. राम मंदिर देशाच्या अस्मितेचा विषय असल्याने त्यावर टिकाटिप्पणी करणे योग्य नाही. मात्र या देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत असे भाजपला वाटते. त्यामुळे त्यांनी शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकेला किंमत दिली नसावी. राम मंदिर कारसेवकांच्या रक्तातून, त्यागातून, बलिदानातून उभे राहिले असे त्यांना वाटत नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.