‘डर्टी पॉलिटिक्स’चा अंत जवळ आलाय! – संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुडाचे राजकारण सुरू केले. फडणवीस यांच्या दळभद्री आणि डर्टी पॉलिटिक्सचा अंत आता जवळ आलेला आहे. तीन घाशीराम कोतवालांवर आता महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास राहिलेला नाही, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मिंधे सरकारवर केला.

सरकार बदलल्यावर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल अशा वावड्या जाणूनबुजून उडवणाऱ्या फडणवीस यांचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पुण्यात शेवटच्या काळात पेशव्यांचे राज्य चालू होते, त्याच पद्धतीने फडणवीस व त्यांची लोक काम करतात. हे तीन घाशीराम कोतवाल असून त्यांच्या हातात महाराष्ट्र आहे. धाशीराम कोतवालचा इतिहास आम्ही महाराष्ट्राला सांगू. अक्षरश: लुटमार, अराजकता होती, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रावर आम्ही राज्य केले नाही का? महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले. 70 वर्षात अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले. यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. फडणवीस यांना हे माहिती नसेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे महाभारत समजून घ्यावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुडाचे राजकारण सुरू केले. आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. राज्य जाईल अशी त्यांना भीती वाटतेय. आपण हरतोय याची त्यांना भीती असल्याने तो लोकांना धमकी देत आहेत. फडणवीस पडद्यामागून कपट कारस्थान करत असून महाराष्ट्र ते उघड्या डोळ्याने पहात आहे.

‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या वल्गना करणारे 4 राज्यात एकत्र निवडणुका घ्यायला घाबरतात; संजय राऊत यांची फटकेबाजी

चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही. अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते. नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्याच योजना नावे बदलून चालवल्या. गरिबांबाबत, संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत काँग्रेसच्या ज्या योजना होत्या त्याच योजनांची, संस्थांनी आणि इमारतींची नावे मोदींनी बदलली, असा आरोपही राऊत यांनी केला.

सरकार जाणार आहे त्यामुळे फडणवीस यांची झोप उडालेली असून त्यांना आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यांच्या डर्टी पॉलिटिक्सचा अंत जवळ आलेला आहे. महाराष्ट्रामुळे मोदी-शहांनी बहुमत गमावले. तो महाराष्ट्र यांच्या हातात सत्ता देईल का, तर अजिबात नाही, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)