‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे प्रदर्शन नागपुरात भरवू, फडणवीसांनी उद्घाटन करावं; राऊत यांचे आव्हान

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी जाण्याचे टाळले असून आगामी काळात संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावरही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. यासह अयोध्येतील लढ्यात फक्त आम्हीच होतो असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला.

एकनाथ शिंदे यांना सर्वप्रथम अयोध्येला आम्हीच घेऊन गेलो होतो. शरयूतीरावर भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याचे यजमानपद नाशिक शिवसेनेकडे होते. त्यावेळी त्यांनी तिथे प्रथम पाऊल ठेवले होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून जात असतील तर आनंद आहे. कारण आता ते भाजपचे आहेत आणि त्यांना त्यांचे आदेश पाळावे लागतील. त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, डेमोक्रसी क्लब येथे शिवसेनेचे शिबिर होत असून तिथे ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे प्रदर्शनह आजपासून सुरू होत आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई हे त्या लढ्यातचे प्रमुख शिलेदार होते. ते स्वत: रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होते. मुंबईतून जे कारसेवकांचे पहिले पथक गेले, त्यात मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई यांच्यासह असंख्या लोकांचा समावेश होता. त्यांचे जे अनुभव आहेत, रोमांचक छायाचित्र, व्हिडीओ क्लिप्स आहेत. याचे प्रदर्शन सुभाष देसाई यांच्या प्रेरणेतून होत आहे.

नाशिकनंतर असे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात काही गोष्टी आठवत नाहीत, त्यांच्या स्मरणशक्तीला धक्का देण्यासाठी आम्ही नागपूरलाही हे प्रदर्शन भरवू. ते खरे रामभक्त असतील आणि अयोध्येतील आंदोलनात त्यांचा सहभाग असेलतर त्यांनी त्या प्रदर्शनाचे उद्घाटन करावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

…म्हणून शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी रामजन्मभूमी आंदोलनातील जो फोटो शेअर केला आहे आमि ज्या छायाचित्रकाराचे नाव सांगितले आहे ते नवभारतमध्ये कामाला नव्हते. ते लोकमतचे छायाचित्रकार होते आणि लोकमतमधूनच निवृत्त झाले. आता त्यांचे निधन झाले असून ते लोकमतनिष्ठ होते. त्यांचा नवभारतची संबंध नव्हता. फोटोमध्ये देवेंद्र फडणवीससदृश्य एक तरुण मुलगा दिसतोय. ते गेलेही असतील. पण मीच गेलो आणि दुसरे कोणीच नव्हते, विशेषत: शिवसेनेचे कोणीच नव्हते त्यांचे हे विधान संपूर्ण आंदोलनाचे आणि कारसेवकांचे अपमान करणार आहे. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, लालकृष्ण आडवाणी यांनी जो संघर्ष केला, लोकांना प्रेरणा दिली. बाळासाहेब ठाकरे त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. त्या संपूर्ण लढ्याचे, कारसेवकांचे आणि आंदोलनाचा फडणवीस अपमान करत आहेत, असा निशाणाही राऊत यांनी साधला.