राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा; संजय राऊत यांचा घणाघात, फेक नरेटीव्हवरूनही केला मिध्यांवर प्रहार

बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्याने अत्याचार केला. याप्रकरणावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून बदलापूरसह राज्यभरात जनतेचा उद्रेक पहायला मिळत आहे. मात्र हे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर संशय व्यक्त केला. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेत राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा असल्याची घणाघाती टीका केली. ते माध्यमांशी बोलत होते.

राज्याचा मुख्यमंत्री हा संशयी आत्मा आहे. त्यांचा दिवसातील अर्धा दिवस हा संशयकल्लोळात, जादुटोणा, मंत्र-तंत्र, अंधश्रद्धा यात जातो. त्यामुळे त्यांना असा संशय येणे साहजिक आहे. बदलापुरात हजारो, लाखो लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलकांवरही कोणीतरी जादुटोणा केला असावा असेही त्यांना वाटले असेल. कारण ते जादुटोणाप्रेमी आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला

मुख्यमंत्र्यांनी निट डोळे उघडले तर त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत. एकाचवेळी लाखो लोक मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांचा मुलगा तिकडला खासदार आहे. मुख्यमंत्री किंवा त्यांचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीलाही जाऊ शकला नाही, एवढे ते घाबरलेले आणि भयग्रस्त होते. बदलापूरच्या पीडित मुलीच्या आईची तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते. ती आई गरोदर असून तिला 10 तास ताटकळत ठेवले. हे विरोधकांनी केले काय? यात विरोधकांचा काय दोष? असा सवालही राऊत यांनी केला.

यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या एका व्हायरल क्लीपवरही भाष्य केले. मुख्यमंत्र्यांची एक क्लीप व्हायरल होत असून ते सांगताहेत की, दोन-चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती आणि ती आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवली व आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली. ही घटना कोणत्या हद्दीत घडली? कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला? कोणत्या न्यायालयाने आरोपीला फासावर लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात आरोपीला फाशी दिली याचा तपशील त्यांनी जाहीर करावा. महाराष्ट्रापासून ते का लपवून ठेवले? की भलत्याच माणसाला भाशी दिली? आरोपीला वर्षा बंगल्यामागे की राजभवनामागे फाशी दिली हे सांगावे, असे आव्हान राऊत यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, एखाद्या राज्यामध्ये फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते. राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य महाराष्ट्राच्या राज्यपालांनी गांभीर्याने घ्यावे. परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली का याची चौकशी केली. जर तुमच्याकडे अशी एखादी नोंद असेल तर ती महाराष्ट्रासमोर आणावी.

हे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला मूर्ख समजले आहे का? महाराष्ट्रात ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. काल पुण्यात, अकोल्यात झाले. काय करताहेत मुख्यमंत्री, गृहमंत्री? असा जळजळीत सवालही राऊत यांनी केला.

राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटीव्ह पसरवतात; हा घ्या पुरावा! विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

नितेश राणेंची घुलाई

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. यावरून नितेश राणे यांनी टीका केली. याचाही समाचार घेत राऊत म्हणाले की, याचा अर्थ केंद्र सरकारवर, मोदी, शहा यांच्यावर तुमचा विश्वास नाही. महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना ही सुरक्षा दिली ती काढून घ्या असे पत्र त्यांनी लिहावे. अमित शहा यांनाही पत्र लिहून तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही मूर्ख आहात. कोणालाही सुरक्षा देता असे सांगावे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल अशा प्रकारची भाषा होत असताना गृहमंत्री फडणवीस तोंड शिवून बसलेत, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला.