विरोधकांचे 275 खासदार केव्हा होतील हे मोदी- शहांना कळणारसुद्धा नाही – संजय राऊत

काँग्रेसचे शंभरपेक्षा जास्त खासदार आहेत. आम्ही सगळे मिळून 240 खासदार आहोत, त्याचे 275 कधी होतील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कळणारसुद्धा नाही, असा इशारा शिवसेना पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एनडीए सरकारला दिला.

नाशिकमध्ये सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दहा वर्षांत मोदी सरकारने विरोधी पक्षाला चिरडण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला. तोच विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेत जात आहे. विरोधी पक्ष काय असतो, हे आता त्यांच्या ईस्ट इंडिया पंपनीला कळेल. आमचे 240 चे 275 कधी होतील हे त्यांना कळणारसुद्धा नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सांवत, भारतीय कामगार सेनेचे जीवन कामत आदी हजर होते.

विधानसभा निवडणुकीत बांबू आरपार जाईल
विरोधात बोलणाऱयांना बांबू लावायला हवा, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जो बांबू घातलेला आहे, तो अद्याप निघालेला नसल्याने मुख्यमंत्र्यांना स्वप्नातही बांबूच दिसतो, विधानसभा निवडणुकीत तो आरपार जाईल. त्यांना लोक रस्त्यावर बांबूचे फटके मारतील. बांबूच्या बायोप्रॉडक्ट्सचे प्रयोग त्यांच्यावर होतील. बांबू अभ्यासावरच मुख्यमंत्र्यांना एखादी डिग्री मिळू शकते, असा टोलाही राऊत यांनी हाणला.