शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हुकुमशाही, झुंडशाही अन् गुंडगिरी सुरुय! – संजय राऊत

भारतीय जनता पक्ष हा फुगलेला बेडूक आहे. हा बेडूक कितीही फुगला तरी बैल होणार नाही. सरकार प्रत्येक वेळी आकडे फुगवून सांगते, पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. हजारो, लाखोंच्या संख्येने लॉन्ग मार्च काढत, चालत, जिवाची पर्वा न करत दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्याला सरकार मूर्ख समजते का? असा परखड सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, लाखोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करतोय. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाला आहे. किमान आधारभूत किंमत आणि काही कायद्यांसंदर्भात त्यांना शंका असून यासाठीही ते देशाच्या राजधानीच्या दिशेने येत असून त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सिमेवर तोफा, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचा फवारा मारला जातोय, पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत. ट्रॅक्टर आणि इतर वाहनं जाऊ नये यासाठी रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्येही ब्रिटिशांनी अशा प्रकारची दमणशाही केली नव्हती. ती दमणशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात करत आहे.

स्वातंत्र्यकाळातही शेतकऱ्यांनी आंदोलनं केली होती. पंजाबच्या लाला लतपतराय हेच त्यांचे नेते होते. ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारात त्यांचे निधन झाले आणि आंदोलन पेटले. आताही मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे. का? देशाच्या राजधानीत शेतकरी आपले प्रश्न घेऊन येऊ शकत नाही का? देशाची राजधानी मोदींनी त्यांच्या मित्राच्या, उद्योगपतीच्या नावावर केलीय का? देशाच्या राजधानीत आपले प्रश्न मांडण्यासाठी शेतकरी येणार असेल आणि जर त्याला रोखले जात असेल तर सरकारची ही एक प्रकारची हुकुमशाही, एकाधिकारशाही, झुंडशाही आणि गुंडगिरी आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

केंद्र सरकारने नुकतेच डॉ. स्वामिनाथन यांना भारतरत्न दिले. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा अशी त्यांची मागणी होती. मोदी सरकार 2014 पासून शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल केले जाईल म्हणतंय, पण शेतकऱ्यांना सिंगल उत्पन्नही मिळेना. पिकविमा योजनेचाही बोजवारा उडाला आहे. शेतकरी गारपीट, अवकाळी पाऊस या आपत्तीशी झुंजतोय, पण बांधावर जायला कोणी तयार नाही. सर्व राजकारणात अडकले आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख काल उत्तर महाराष्ट्र, संभाजीनगरात होते आणि त्यांनी प्रत्येक सभेमध्ये हा प्रश्न मांडला आहे. लवकरत ते एक पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. पण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना तोफा रोखलेल्या आहेत, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत त्याचा आम्ही निषेध, धिक्कार करतो, असेही राऊत म्हणाले.