उद्धव ठाकरे यांनी भाजपची तडिपारीची नोटीस काढली आहे – संजय राऊत

संपूर्ण देशातले भ्रष्टाचारी, चोर-दरोडेखोर, बलात्कारी आणि तडीपार या सगळ्यांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. पण, या भाजपलाच आता तडिपार करण्याची नोटीस उद्धव ठाकरे यांनी काढली आहे. सगळ्या तडिपारांचा पक्ष असलेल्या भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आपण साथ दिली पाहिजे, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलं. पनवेल येथील जनसंवाद यात्रेवेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने फिरताहेत. आता जनसंवाद म्हणजे काय असतो. लहान लहान बैठका घेणं, शाखेत जाणं, कार्यालयात जाणं, पण संवादाचं रुपांतर ज्या पद्धतीने भगव्या तुफानात झालेलं आहे. ते तुफान पाहिल्यावर ही खात्री पटतेय की कितीही डुप्लिकेट शिवसेना येऊद्यात. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच या महाराष्ट्रात या देशात अजिंक्य आणि अजेय राहिल्याशिवाय राहणार नाही. तिकडल्या खासदाराने बेईमानी केली, तेव्हा वाघेरे पाटील आपल्यावर जबाबदारी आहे की इथली गद्दारी इथे कायमची गाडायची. मावळ मतदारसंघाचं वैशिष्ट्य हे आहे की, रायगड आहे आणि वर मावळ आहे आणि दोन्ही जिल्हे छत्रपती शिवरायांचे आहेत. या दोन्ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आहेत. आणि या मातीला कलंक लावण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना इकडली जनता माफ करणार नाही. कालच उद्धव ठाकरे यांनी फार मोठी घोषणा केली आहे. ती घोषणा जिथे पोहोचायची तिथे पोहोचली आहे. तुमचे नरेंद्र मोदी काय म्हणतात अबकी बार 400 पार तर उद्धव ठाकरेंनी घोषणा दिली आहे, अबकी बार भाजप तडिपार. आणि काल ही तडिपारीची नोटीस उद्धव ठाकरे यांनी काढली आहे. आमच्या शिवसैनिकांवर आजवर इतक्या तडिपारीची कारवाई झाली, इतके गुन्हे दाखल झाले. पण आता संपूर्ण भाजपला तडिपारीची नोटीस आपल्या पक्षप्रमुखांनी काढली आहे. संपूर्ण देशातले तडीपार घेऊन हा पक्ष उभा राहिला. सगळे भ्रष्टाचारी, सगळे चोर, सगळे दरोडेखोर, बलात्कारी या सगळ्यांचा तडीपार पक्ष कुठला असेल तर तो भाजप. अशा भाजपला या महाराष्ट्राच्या मातीत स्थान मिळू नये. हा पक्ष इथून कायमचा नेस्तनाबूत केला पाहिजे, यासाठी उद्धव ठाकरे यांनी जो संघर्ष सुरू केला आहे, त्या संघर्षाला आपण साथ दिली पाहिजे. मावळ तर आपण जिंकणारच आहोत, बाजुला रायगड जिंकणार आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे 48 पैकी किमान 40 खासदार निवडून आणायचे आणि या दिल्लीतून नरेंद्र मोदींचं सरकार हद्दपार करायचं, यासाठी हा जनसंवाद सुरू आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांच्या निवडणूक निधीसाठी दिलेल्या देणगीचाही त्यांनी समाचार घेतला. राऊत म्हणाले की, काल नरेंद्र मोदी यांनी फार मोठा विनोद केला. भाजपच्या प्रमुख लोकांना शेठ म्हणतात. इथे पण एक शेठ आहेत. ते शेठ होतात, जनता गरीब होते. नरेंद्र मोदींनाही काही जण शेठ म्हणतात. त्या नरेंद्र मोदींनी भाजपच्या निवडणूक निधीला दोन हजार रुपयांची देणगी दिली. शेठने देणगी दिली. अरे तुमच्या खात्यात इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून, भष्ट्राचाराच्या माध्यमातून 7 हजार कोटी रुपये कसे गोळा केले ते आधी सांगा. सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारला आहे. आणि तुम्ही दोन हजारांची देणगी देऊन नाटक करताय. हे ढोंग भाजपचं आहे, ही भाजपची लफंगेगिरी आहे. तीच आपल्याला संपवायची आहे. ज्या उत्साहाने आपण पनवेलला स्वागत केलंत. मला खात्री आहे मावळपासून रायगडपर्यंत संपूर्ण वातावरण भगवं झाल्याशिवाय राहणार नाही, ते होतानाही दिसत आहे. शिवसेना अशीच आहे, अंगावर आली तर शिंगावर घेऊ, अरे म्हणाल तर कारे म्हणू. उगीच आमच्या नादाला लागू नका. आमचा नाद करायचा नाही. तुम्हाला दुसऱ्याच नादाला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी या सभेतून दिला.