लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही! संजय राऊत यांचा घणाघात

लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधी बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भोर तालुक्यात महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ही घोषणा करण्यात आली. याच सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही, अशा शब्दांत राऊत यांनी निशाणा साधला.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी व्यासपीठावरून मला दाखवले, पाहा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत. सूर्य मावळल्यानंतर या प्रकाशात टोप्या अजून उजळून निघाल्या. स्वच्छ चकचकीत या टोप्या बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून धुवून निघालेल्या नाहीत. या ओरिजिनल, प्रामाणिक टोप्या आहेत आणि मुख्यतः बदलणाऱ्या टोप्या नाहीत. सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांची नक्कीच कर्जमाफी करू, पण गद्दारांना माफी करणार नाही. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो पळपुट्यांचा नाही, अशा शब्दांत संजय राऊत कडाडले.

ही लढाई बारामतीची लढाई नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि पवार साहेब आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे –

शरद पवार हे राजकारणातले पितामह आहेत.
जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली, तेव्हा हा सह्याद्री उभा राहिला. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
देशाचे प्रधानमंत्री म्हणतात, अब की बार 400 पार; त्यावर आम्ही घोषणा करू, आपकी बार भाजपा तडीपार..!
मिशन 45 अशी घोषणा अमित शहांनी केली. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा.
हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष झाला. मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय? मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्यांनी शिकवलं आहे. कपिल देवला बॉल कसा घासायचा आहे हे त्यांनी शिकवलं. वीरेंद्र सेहवागला सिक्सर मारता येत नव्हता तो या जय शहाने शिकवला आहे. त्यामुळे, तो अध्यक्ष आहे.
नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला. त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला. तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला.