चांगल्या योजनांमध्ये खोडा टाकण्याचं पाप मोदींनी 10 वर्षे केलं, आम्ही नाही; संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर बरसले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते विदर्भ दौऱ्यावर आहेत. विदर्भातील सर्वच जागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. चांगल्या योजनांमध्ये खोडा घालण्याचं पाप आम्ही करणार नाही, ते मोदींनी गेली दहा वर्षे केलं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

लाडकी बहीण योजनेमध्ये कुणीही खोडा टाकत नाही, ते हल्ली स्वप्नात असतं. त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही, ऐकू येत नाही. कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये ज्याच्यापासून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला, महिलांना, बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना कुणाच्या मालकीची नसते, सरकारची असते. त्याच्यामध्ये खोडा टाकण्यांचं पाप आम्ही करणार नाही. ते नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्षे केलेलं आहे. काँग्रेस सरकारच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावाने खपवल्या आणि काँग्रेसला शिव्या घातल्या. महाराष्ट्रातसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या. पण हे सरकार आल्यावर त्यांनी त्या बंद केल्या. आम्ही अशा प्रकारचे काम करणारी माणसं नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.

फडणवीसांच्या घरात टांकसाळ

फडणवीसांच्या नागपूरच्या घरामध्ये टांकसाळ लावली आहे ना. सरकारी पैसे आहेत. आमचं सरकार जर आलं तर राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे टकाटक, फटाफट, खटाखट सगळं झालं असतं. आणि लवकरच ते महाराष्ट्रात होईल याबद्दल शंका नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये भ्रष्टाचारी नेते’

कर्नाटकच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांविरोधात एका भ्रष्टाचार प्रकरणात तपासाचे आदेश दिलेत. यावरही बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सरकारमध्ये घेतले आहे. त्यांच्याविरोधातही तपासाचे आदेश आम्ही दिले होते. कर्नाटकचे येडीयुरप्पा ज्यांच्याविरोधात तपास सुरू होता, त्यांना काही झाले नाही. प्रत्येक राज्यात भाजपच्या प्रत्येक नेत्यावर काही ना काही भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. मात्र निजाम त्यांचा, राज्यपाल त्यांचे, न्यायालय त्यांचे त्यामुळे हे लोक काही करू शकतात, असे संजय राऊत म्हणाले.

”मविआ’ विदर्भात चांगला स्कोअर करेल’

रामटेकची जागा शिवसेना लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जागावाटपाबाबत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. लवकरच जागावाटपाचा निर्णय होईल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. लोकसभेत महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसला वर्ध्याची जागा मिळाली. यवतमाळ, वाशिमची जागा आमच्याकडे आली. बुलढाणा आम्ही थोड्या मतांनी गमावली. काँग्रेसला उत्तम यश मिळालं. महाविकास आघाडीचं यश पाहता विदर्भात यावेळेला चांगला स्कोअर करेल, याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही, असे संजय राऊत यांनी ठाम सांगितले.

गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आहेत. सर्वच जिल्ह्यांत पक्षाचे नेते जाऊन आले. विदर्भातील सर्वच जागांबद्दल आम्ही आढावा घेतला. विधानसभेत नागपूर शहरामध्ये शिवसेना रामटेकची जागा लढवणार आहे. त्या दृष्टीने शिवसैनिक, कार्यकर्ते, पक्षाचे इतर पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा होईल. आमचे शहरप्रमुख नागपूरचे प्रमोद मानमुडे यांनी पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा, इतर काही कार्यक्रम ठेवलेले आहेत, त्याला उपस्थित राहू.

निवडणुकाजवळ आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शिवसेनेचं गेल्या काही दिवसांपासून जे काम चाललंय ते पाहतोय. आम्ही रामटेकची लोकसभेची जागा काँग्रेसला दिली. विधानसभेला नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून इथे जागा लढवू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.