पराभवाच्या भीतीने शिवसैनिकांना अटक; पोलीस, निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव, संजय राऊत यांचा संताप

भांडूपमध्ये डमी मशिनचे प्रात्यक्षिक दाखवून मतदारांमध्ये जनजागृती करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून पराभवाच्या भीतीने शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले.

निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणा करत असल्याचे स्पष्ट दिसत असून त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. तरीही आमच्यासारखे पक्ष, महाविकास आघाडी, इंडिया आघाडी जिद्दीने लढत आहेत. सर्वत्र प्रचंड पैशाचे वाटप सुरू असून निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केलेली नाही. निवडणूक आयोग भाजपची शाखा भाजपची शाखा म्हणून काम करत असून या सगळ्याचा सामना करत आम्ही जिद्दीने रस्त्यावर उतरलो आहोत, असे खासदार Sanjay Raut म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी टेबलावर मतपत्रिका ठेऊन आपला उमेदवार, चिन्ह कोणते हे सांगितले जायचे. आता ईव्हीएम असल्याने डमी मशिन उभारून मतदारांना मार्गदर्शन केले जाते. यासंदर्भात निवडणूक आयोगाची कोणतीही नियमावली नसतानाही इकडच्या भाजप नेत्यांनी पोलिसांवर, निवडणूक आयोगावर दादागिरी करून शिवसैनिकांना अटक केली.

पैसे वाटप करताना तक्रार केली तेव्हा त्यांना अटक झाली नाही. किंबहुणा पैसे वाटप करणआऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणून गृहमंत्री मुलुंडला आले आणि उमेदवाराच्या कार्यालयात बसून पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली. यातून निवडणूक आयोगाचा पत्रपातीपणा उघड होतो. भाजपला जिंकण्याची खात्री नाही, मतदार आणि जनताही त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्या लोकांना अटक केली जात आहे. पण हा पैशाचा दबाव झुगारून महाराष्ट्रातील मतदान केले असून 4 जूननंतर सत्ताधाऱ्यांना कळेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, ईशान्य मुंबईत प्रचारासाठी भाजपची बडे नेते, पंतप्रधान आले. यावरही राऊत यांनी भाष्य करत म्हटले की, एका बाजुला येथे निरपराधन लोकं मरण पावले आणि त्यांच्या समोर देशाचे नेते, कार्यवाहक पंतप्रधान रोड शो करतात हे किती असंवेदनशील आहे. ईशान्य मुंबईत राज ठाकरे, नारायण राणेंसह सगळेच रस्त्यावर उतरवले. राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षासाठी एवढी मेहतन घेतली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण भाजपने अनेकांना भाड्याने घेतल्याने त्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहेत. ज्या मोदी-शहांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही असे म्हणणाऱ्यांना त्यांच्या पखाल्या वाहताना पाहून वाईट वाटले.

पराभवाच्या भीतीने विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह भाजपचाही राऊत यांनी समाचार घेतला. आम्हाला पराभवाची भीती नसून त्यांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 पेक्षा जास्त जिंकेल. ज्यांना पराभवाची भीती आहे ते यंत्रणेचा दुरुपयोग, पैशाचे वाटप करत आहेत, असे खासदार राऊत म्हणाले. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष चोरणे हा सगळ्यात मोठा रडीचा डाव आहे. रडीच्या डावावर बसणारे, भाजपचे गुलाम बनून राजकारण करणाऱ्यांनी अशी भाषा करू नये, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचीच भीती वाटत असून महाराष्ट्र, बिहार, पंजाब, कर्नाटक ही राज्ये मोदींना सत्तेवरून खाली खेचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Lok sabha election 2024 voting update : महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत 15.96 टक्के मतदान