राजकारण कुटुंबापर्यंत नेण्याची सुरुवात फडणवीसांनी केली, आता त्यांना यातना कळतील – संजय राऊत

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारने नागपुरात पाच ते सहा गाड्यांना उडवले. यानंतर या गाडीमध्ये एक बिल आढळून आले असून त्यावर ‘बिफ कटलेट’चा उल्लेख असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यावरून रान उठलेले असताना पोलिसांनी तातडीने पुढे येत असे कुठलेही बिल नसल्याची सारवासारव केली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपसह पोलिसांचाही समाचार घेतला. राजकारण कुटुंबापर्यंत नेण्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आता त्यांना यातना कळतील, असा घणाघात राऊत यांनी केला.

दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘या संपूर्ण प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही दोष देत नाही. पण भाजपने आतापर्यंत आपल्या विरोधकांच्या कुटुंबावर खासकरून ज्याप्रकारचे खोटे, दळभद्री आरोप करून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, तुरुंगात पाठवले, आज तीच परिस्थिती भाजपच्या काही लोकांवर आली आहे. त्यामुळे कौटुंबिक यातना काय असतात हे हळूहळू भाजपला कळेल.’

‘आम्ही व्यक्तीश: राजकारण आणि राजकीय बदल्याचे राजकारण हे कुटुंबापर्यंत पोहोचू नये या मताचे आहोत. पण आपली ही संस्कृती तोडण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्याची सूत्र गेल्यावर भाजपने महाराष्ट्रात केले’, असेही राऊत म्हणाले.

‘संकेत बावनकुळेच्या गाडीमध्ये एक बिल मिळाले अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. त्या बिलामध्ये बिफचा उल्लेख होता. पोलिसांना हे बिल जप्त करायला आणि बिल काढायला चार दिवस का लागले?’ असा सवाल करत राऊत म्हणाले की, ‘गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आली. गाडी कुणाची याचा एफआयआरमध्ये उल्लेख नाही. गाडीतील लोकांच्या मेडिकल रिपोर्टचा उल्लेख नाही. या सगळ्या गोष्टीची सारवासावर पोलीस करत आहेत. मात्र बिफचा उल्लेख आल्यावर पोलीस स्वत: पुढे येऊन सांगताहेत असे काही नाही. ज्या देशामध्ये EVM ची मतं बदलली जाऊ शकतात, त्या देशामध्ये काहीही होऊ शकते. भाजपला सगळे सोपे आहे. त्याच्यामुळे हे बिल सापडले आणि बिलात काही नाही या गोष्टीवर विश्वास नाही’, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ‘कुणी काय खावे अन् काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. बिफ खाणे हा काही राष्ट्रीय अपराध नाही. भाजपच्या अनेक राज्यांमध्ये खुलेआम बिफ विकले जाते आणि खाल्ले जाते. कुणी काय खावे हे मोहन भागवत यांनीही नुकतेच सांगितले आहे. त्यामुळे कुणी काय खाल्ले आणि त्यामुळे ते गुन्हेगार आहेत असा मानणारा आमचा पक्ष नाही. तसेच मागच्या दाराने पैसे फेकले, उपचाराचा खर्च केला म्हणजे न्याय मिळाला असे होत नाही. ज्याने हा अपराध केला त्याच्यावरती कठोर कारवाई करणे याला न्याय म्हणतात’, असेही राऊत म्हणाले.