महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं करपली. त्यानंतर रब्बी पिकांच्या वेळी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दुष्काळ, अवकाळी पाऊस या दुहेरी माऱ्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अशात सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
हा आहे आजचा महाराष्ट्र! https://t.co/wvCOVScvlu
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2024
शेतकऱ्यांच्या या भयाण परिस्थितीचे वास्तव दाखवणारा असा एक व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओत शेतकऱ्याचा मुलगा आठवडा बाजारात जुने कपडे विकत घ्यायला आलेला आहे. त्याने मॅक्स महाराष्ट्रा या वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकरी कुटुंबाचे सध्या कसे हाल सुरू आहेत ते सांगितले आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना तो मुलगा ‘शाळेत उघडं कसं जायचं?’ असा सवाल करतो, त्याचा तो प्रश्न ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
”माझ्या वडिलांकडे कपडे घ्यायला पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही इथे येऊन कपडे घेतो. यंदा सोयाबिन गेलं. पिक गेलं. सरकारची काहीच मदत मिळाली नाही. सरकार म्हणते विमा दिला, हे दिलं ते दिलं. पण आम्हाला काहीच मिळालं नाही. त्यामुळे इथे येऊन जुने कपडे घ्यावे लागत आहेत. शंभर रुपयाला इथे कपडे मिळतात. अंग तरी झाकलं जातं ना. शाळेत उघडं कसं जायचं? त्यामुळे इकडे येऊन कपडे घेतोय, अशी व्यथा शेतकऱ्याच्या त्या मुलाने मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली आहे.